साहित्य संघाच्या निवडणुकीत मतचोरीचा आरोप, ‘ऊर्जा’ आणि ‘डॉ. भालेराव विचार मंच’ पॅनेल आमनेसामने

तब्बल दोन दशकांनी होणाऱ्या गिरगाव येथील मुंबई मराठी साहित्य संघाच्या निवडणुकीची रंगत वाढली आहे. निवडणुकीत ऊर्जा पॅनेल आणि डॉ. भालेराव विचार मंच असे दोन गट परस्परविरोधी उभे आहेत. निवडणुकीत मतचोरीचा आरोप होत आहे. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
साहित्य संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मनमानी सुरू असल्याचा आरोप डॉ.भालेराव विचार मंचने आज पत्रकार परिषद घेऊन केला. संघातील कर्मचारी आणि निवडणूक अधिकारी यांच्याशी संगनमत करून 600 सदस्यांच्या मत पत्रिका चोरून लपवून ठेवल्या आहेत. तसेच मतदारांना आता ‘डुप्लिकेट’ मतपत्रिका दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप डॉ. भालेराव विचार मंच पॅनलच्या उमेदवारांनी डॉ. उषा तांबे यांच्या ‘ऊर्जा’ पॅनलवर केला आहे. निवडणुकीचा कंत्राटदार आणि निवडणूक अधिकारी यांची फौजदारी चौकशी व्हावी, अशी मागणी भालेराव पॅनलने केली आहे. पत्रकार परिषदेला डॉ.भालेराव विचार मंच पॅनलचे उमेदवार प्रा.नरेंद्र पाठक, प्रमोद पवार, दिवाकर दळवी, अनिल गजके, सारंग दर्शने उपस्थित होते.
मतदार यादी अद्ययावत केलेल्या नाहीत. त्यामुळे 345 पत्रे परत आली. मतदारांकडे चौकशी केली असता त्यांना अद्याप मतपत्रिका मिळालेल्या नाहीत. 600 मतपत्रिका लपवून ठेवण्यात आल्या आहेत. योग्य वेळी ही मतपेटीत टाकायची कारस्थान रचण्यात आले आहे. मतपत्रिकेचे कंत्राट ज्या खासगी एजन्सीला देण्यात आले त्या एजन्सीने प्रत्यक्षात मतपत्रिका न पाठविता केवळ बुकिंग रिसिट साहित्य संघात जमा केले. हा फौजदारी स्वरूपाचा आर्थिक घोटाळा असून त्याची चौकशी करण्यात यावी.
झेड प्रमोद पवार, उमेदवार (डॉ.भालेराव विचार मंच)
या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही. मतदानाची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. त्याची मुदत वाढवून 17 सप्टेंबर करण्यात आली आहे. निवडणूक पारदर्शक, निष्पक्षपणे होईल. ज्यांना मतपत्रिका मिळाली नाही, त्यांना आम्ही देतोय. ज्यांच्या मतपत्रिका परत आल्या आहेत, त्यांनाही घेऊन जाण्यास सांगितले आहे. कोणतीही मतचोरी झालेली नाही.
झेड ऍड यशोधन दिवेकर, निवडणूक अधिकारी
Comments are closed.