Asia Cup 2025: अफगाणिस्तानचा आशिया कपमधील सर्वात मोठा विजय, सलामी सामन्यात हाँगकाँगचा 94 धावांनी धुव्वा

अबुधाबीतील शेख जायद स्टेडियमवर झालेल्या टी20 आशिया कप 2025 च्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने हाँगकाँगचा 94 धावांनी धुव्वा उडवत दमदार सुरुवात केली. राशीद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानने 189 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र हाँगकाँगची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली आणि संघाने 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 94 धावा केल्या. हा अफगाणिस्तानचा टी20 आशिया कपमधील धावांच्या फरकाने सर्वात मोठा विजय ठरला.

हाँगकाँगकडून बाबर हयातने (43 चेंडूत 39 धावा, 3 चौकार) सर्वाधिक धावा केल्या. कर्णधार यासिम मुर्तजा (16) शिवाय इतर फलंदाज दुहेरी धावसंख्याही ओलांडले नाहीत. अंशुमन रथ आणि निजाकत खान तर शून्यावर बाद झाले. अफगाणिस्तानकडून गुलबदीन नायब आणि फजलहक फारूकी यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले, तर अजमतुल्लाह उमरजई, राशीद खान आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला. हाँगकाँगचे दोन खेळाडू धावबाद झाले.

त्याआधी, अफगाणिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 6 बाद 188 धावा उभारल्या. सलामीवीर सेदिकुल्लाह अटलने 52 चेंडूत नाबाद 73 धावा ठोकल्या, तर ऑलराउंडर अजमतुल्लाह उमरजईने फक्त 21 चेंडूत झंझावाती 53 धावा केल्या. रहमानुल्लाह गुरबाज (8) लवकर बाद झाला असला तरी अटलने मोहम्मद नबी (33) सोबत 51 धावांची भागीदारी केली. नंतर उमरजईसोबत त्याने 82 धावांची जोरदार भागीदारी केली.

उमरजईने 19व्या षटकात सलग तीन षटकार आणि एक चौकार लगावत आपले पहिले टी20 आंतरराष्ट्रीय अर्धशतक पूर्ण केले. त्याची ही फिफ्टी एशिया कपच्या इतिहासातील दुसरी सर्वात वेगवान अर्धशतक ठरली. त्याने 20 चेंडूत अर्धशतक गाठले, ज्यात 2 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. अटलने आपल्या खेळीमध्ये 6 चौकार आणि 3 षटकार ठोकले. शेवटी कर्णधार रशीद खान 3 धावांवर नाबाद राहिला.

Comments are closed.