उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत एनएलडी जिंकला
राधाकृष्णन यांचा अपेक्षेपेक्षाही मोठा विजय, एकंदर 452 मतांची प्राप्ती, विरोधी पक्षांचा दारुण पराभव
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
`भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल चंद्रपुरम पोन्नुस्वामी राधाकृष्णन यांनी मोठ्या मताधिक्क्याने ही निवडणूक जिंकली आहे. राधाकृष्णन यांना 752 मतांपैकी मतांपैकी 452 मते मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर त्यांचे प्रतिस्पर्धी आणि विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार बी. सुदर्शन रे•ाr यांना 300 मते मिळाली आहेत.
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पदत्याग केल्याने ही निवडणूक घ्यावी लागली होती. या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेतील विद्यमान खासदारांना मतदान करण्याचा अधिकार असतो. बिजू जनता दल, भारत राष्ट्र समिती आणि शिरोमणी अकाली दल या तीन पक्षांनी या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे एकंदर 12 खासदार आहेत. तसेच, विरोधी पक्षांमधील वायएसआर काँग्रेसने सत्ताधारी आघाडीच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अपेक्षेपेक्षा मोठा विजय मिळविणे साध्य झाले आहे.
योग्य ‘व्यवस्थापन’
या निवडणुकीचा निर्णय प्रारंभापासूनच निश्चित होता. कारण लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी बहुमतात आहे. त्यामुळे ही निवडणूक निर्विरोध व्हावी, असे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केले गेले होते. तथापि, विरोधी पक्षांनी आपला उमेदवार देऊन ही निवडणूक स्पर्धात्मक आणि प्रतिष्ठेची बनविली होती. मात्र, विरोधी पक्ष कोणतेही आश्चर्य घडवू शकलेले नाहीत. या निवडणुकीचा निर्णय अपेक्षेप्रमाणेच लागल्याचे दिसून आले आहे. निवडणूक होणार, हे निश्चित झाल्यानंतर सत्ताधारी आघाडीकडून जास्तीत जास्त मोठा विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या आघाडेचे ‘व्यवस्थापन’ अशा प्रकारे यशस्वी ठरल्याचे आणि रणनीतीला यश मिळल्याचे दिसून येत आहे.
दोन्ही उमेदवार दक्षिणेतील
या निवडणुकीत दोन्ही उमेदवार दक्षिणेतील होते. सत्ताधारी आघाडीचे सी. पी. राधाकृष्णन हे तामिळनाडूचे, तर विरोधी पक्षांचे बी. सुदर्शन रे•ाr हे तेलंगणाचे आहेत. त्यामुळे हा संघर्ष दक्षिण विरुद्ध दक्षिण असाच एकप्रकारे होता, हे मतदानापूर्वीच स्पष्ट झाले होते. अखेर सत्ताधाऱ्यांनी मोठा विजय प्राप्त केला आहे.
प्रशिक्षण शिबीरे
सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वतीने या निवडणुकीपूर्वी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वतीने तिच्या खासदारांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसांच्या या शिबिरात प्रत्येक खासदाराला या निवडणुकीत मतदान कसे करायचे, याची माहिती देण्यात आली होती. या निवडणुकीत मतदारांची संख्या मर्यादित असली, तरी निवडणूक प्रक्रिया सोपी नसल्याने या प्रशिक्षणाची आवश्यकता होती, असे स्पष्ट करण्यात आले होते. विरोधी पक्षांनीही आपल्या उमेदवाराला मते घालणाऱ्या मतदारांना प्रशिक्षणात्मक सूचना देण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते, अशी माहिती देण्यात आली.
पंतप्रधान मोदी यांचे प्रथम मतदान
मंगळवारी सकाळी 10 वाजता संसद भवनात या निवडणुकीसाठी मतदानाला प्रारंभ करण्यात आला. सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मतदानाच्या अधिकाराचे पालन केल्यानंतर इतर खासदारांनी मतदान केले. मतदाराची वेळ संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असली, तरी दुपारी 3 वाजेपर्यंत 96 टक्के खासदारांनी त्यांच्या मतदानाच्या अधिकाराचा उपयोग केला होता. सर्व लोकप्रतिनिधींनी मतदान केल्यानंतर, संध्याकाळी साडेपाच वाजता मतगणनेस प्रारंभ करण्यात आला.
प्रारंभापासून सत्ताधाऱ्यांचे पारडे जड
या निवडणुकीत प्रारंभापासूनच सत्ताधाऱ्यांचे पारडे जड असल्याचे स्पष्ट दिसत होते. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बाजूने लोकसभेतील 293 तर राज्यसभेतील 125 मते निश्चित होती. अशा प्रकारे या आघाडीला 418 खासदारांचा पाठिंबा मिळणार हे उघड होते. बहुमतासाठी 336 मतांची आवश्यकता होती. विरोधी पक्षांची भिस्त भारतीय जनता पक्षाच्या मित्रपक्षांवर होती. तथापि, ,सर्व मित्रपक्षांनी रालोआच्या बाजूनेच मतदान केले. तसेच विरोधी पक्षांची 11 मते सत्ताधाऱ्यांना मिळाल्याने त्यांनीच विरोधी पक्षांना धोबीपछाड दिल्याचेही स्पष्ट झाले.
अंतिम निर्णय अशाप्रकारे…
एकंदर मतदान 764
राष्ट्रीय लोकशाही आघाडी 452
विरोधी पक्षांची आघाडी 300
अनुपस्थित 12
Comments are closed.