सियाचेन मधील हिमस्खलन, 3 सैनिक शहीद
हुतात्मा सैनिकांमध्ये दोन अग्निवीरांचा समावेश
वृत्तसंस्था/ लेह
लडाखच्या सियाचीन ग्लेशियरमध्ये मोठे हिमस्खलन झाले असून यामुळे तीन सैनिक हुतात्मा झाले आहेत. हुतात्मा सैनिकांची नावे मोहित कुमार, अग्निवीर नीरज कुमार चौधरी आणि अग्नीवर डाभी राकेश देवभाई अशी आहेत. हुतात्मा सैनिक गुजरात, उत्तरप्रदेश आणि झारखंडचे रहिवासी होते. गस्त घालणारे सैनिक हिमस्खलनाच्या तडाख्यात सापडले होते.
तर 5 सैनिक हिमस्खलनानंतर अडकून पडले असून एका कॅप्टनला वाचविण्यात आले आहे. सैन्याच्या बचावपथकांनी त्वरित मोहीम हाती घेतली असून लेह आणि उधमपूर येथूनही मदत घेतली जात आहे. हिमस्खलनाच्या घटनेनंतर सैन्याने अन्य सैनिकांना सुरक्षितस्थळी पाठविले आहे. सध्या हुतात्मा सैनिकांच्या मृतदेहांचा शोध घेतला जात आहे. या भागात प्रचंड प्रमाणात हिमवृष्टी होत असल्याने हिमस्खलनाचा धोका वाढला असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.
सियाचीन ग्लेशियर पूर्ण जगातील सर्वाधिक उंचीवरील युद्धभूमी आहे. तेथे तापमान शून्य ते उणे 60 अंशापर्यंत खालाव असते. यामुळे तेथे तैनात असणाऱ्या सैनिकांना फ्रॉस्टबाइटची समस्या होत असते. सियाचिन ग्लेशियर भारत-पाकिस्ता नियंत्रण रेषेनजीक सुमारे 78 किलोमीटरमध्ये फैलावलेले आहे. याच्या एका बाजूला पाकिस्तान तर दुसरीकडे अक्साई चीन आहे. सामरिक दृष्टीकोनातून या ग्लेशियरचे अत्यंत महत्त्व आहे. सियाचीन येथून भारत शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवू शकतो. यामुळे भारतासाठी हा रणनीतिक स्वरुपात अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे.
1984 पूर्वी या ठिकाणी कुठल्याच देशाचे सैन्य तैनात नव्हते. पाकिस्तान सियाचीन ग्लेशियरवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती 1984 मध्ये गुप्तचरांकडून मिळाली होती. यानंतर 13 एप्रिल 1984 रोजी भारताने स्वत:चे सैन्य तेथे तैनात केले होते. याकरता भारतीय सैन्याने ऑपरेशन मेघदूत राबविले होते.
Comments are closed.