हिंदुस्थानचा वेगवान जयगणेशा, यूएईविरुद्ध 30 चेंडूंतच गाठले लक्ष्य; कुलदीप-शिवमच्या फिरकीची कमाल

पाच षटकांत अवघ्या 10 धावांत यूएईचे आठ फलंदाज बाद करून आपला महाविजय निश्चित केलेल्या हिंदुस्थानने 58 धावांचे विजयी लक्ष्य अवघ्या 4.3 षटकांतच गाठले आणि आशिया कप क्रिकेट स्पर्धेत विजेत्याच्या आविर्भावात आपला जयगणेशा केला. हिंदुस्थानने हा सामना 93 चेंडू आणि 9 विकेट राखून जिंकला. हा आशिया कपमधील आजवरचा वेगवान आणि महाविजय ठरला आहे. आता हिंदुस्थानचा पुढचा सामना 14 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध खेळला जाणार आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी तयारी म्हणून महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात यूएईच्या खेळाडूंनी अक्षरशः निराश केले. सलामीवीर अलिशान शराफू (22) आणि कर्णधार मुहम्मद वसीम (19) यांनी 26 धावांची सलामी दिली. सुरुवात फारशी जोरदार नसली तरी समाधानकारक होती. मात्र ही जोडी फुटल्यानंतर धरण फुटल्यानंतर जशी स्थिती होती तशी स्थिती यूएईच्या फलंदाजांची झाली.

अभिषेकचा झंझावाती प्रारंभ

मग विजयाचे 58 धावांच छोटेसे आव्हान अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल 4 षटकांतच संपवण्याच्या तयारीत होते. पण जुनैद सिद्दिकीला सलग दुसरा षटकार खेचण्याच्या प्रयत्नात अभिषेक शर्मा झेलचीत झाला. हैदर अलीच्या डावाच्या पहिल्याच दोन चेंडूंवर षटकार आणि चौकार ठोकणाऱ्या अभिषेकने 16 चेंडूंत 30 धावा चोपल्या. मग सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिलने पाचव्या षटकात विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

कुलदीपची कमल

इंग्लंड दौऱ्यावर पिकनिक म्हणून फिरून आलेल्या कुलदीप यादवच्या समावेशाबाबत साशंकता होती, पण चोहोबाजूंनी दबाव वाढल्यामुळे हिंदुस्थान तीन फिरकीवीरांसह उतरला. त्यात कुलदीपने कमालच केली. यूएईची फलंदाजी खूपच दुबळी होती. कुलदीपने पहिल्या षटकात एकही विकेट टिपला नाही. मात्र दुसऱ्या षटकात त्याने 3 धावा देत 3 विकेट टिपत 2 बाद 47 वरून यूएईची अवस्था 5 बाद 50 केली. त्यानंतर शिवम दुबेनेही झटपट 3 विकेट टिपत 13.1 षटकांत 57 धावांवरच यूएईचा डाव संपवला. कुलदीप-शिवमच्या फिरकीपुढे यूएईचे आठ फलंदाज अवघ्या 10 धावांत गारद झाले. कुलदीपने 7 धावांत 4 तर शिवमने 4 धावांत 3 विकेट टिपल्या. संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत असलेल्या कुलदीपने संधी मिळताच मॅचविनर कामगिरी केली.

Comments are closed.