मुंबईत वर्षभरात कोट्यवधींच्या एमटीएनएल केबलची चोरी, अंबोलीत आठ जणांना रंगेहाथ पकडले; डक्टमधून रात्री सुरू होते काळे धंदे

गेल्या काही वर्षांपासून मुंबईत एमटीएनएलच्या बंद केबलची चोरी होत असल्याचे प्रकार ठरावीक ठिकाणी घडत होते. परंतु वर्षभरापासून हे प्रकार मोठय़ा प्रमाणावर वाढले असून संपूर्ण मुंबईत पोलिसांच्या नाकाखालून कोटय़वधींच्या एमटीएनएल केबलची चोरी झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जोगेश्वरी परिसरात एमटीएनएलची 58 लाख रुपये किमतीची वायर चोरणाऱ्या आठ जणांना अंबोली पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. ड्रेनेज डक्टमधून रात्री उशिरा हे काळे धंदे करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

महिनाभरापूर्वी गोरेगाव येथेदेखील एमटीएनएल वायर चोरीप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. अंबोली पोलिसांचे पथक आज सकाळी एका शाळेजवळ गस्त करत होते तेव्हा अधिकाऱ्यांना शाळेजवळ केबल वायर, व्रेन आणि ट्रक दिसले. हा प्रकार पोलिसांना संशयास्पद वाटला. तसेच ड्रेनेज डक्टचे झाकणदेखील उघडे दिसले. तेव्हा पोलिसांनी तेथे चौकशी केली. चौकशीत संबंधित कामगाराकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांची बोबडी वळली.  त्यानंतर पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले. याची माहिती एमटीएनएलला कळवली. काही वेळातच एमटीएनएलचे पथक घटनास्थळी आले. केबल चोरीप्रकरणी अंबोली पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. या चोरीमध्ये आणखी कोणी सक्रिय आहे का याचा तपास अंबोली पोलीस करत आहेत. दिनेशकुमार बघेलकर यांच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवत मिलन सिंह, शुभम गोलीकर, संदीप सोनी, नफीस खान, मनोज पासवान, अब्दुल आहाद, अब्बू अब्दुल हलीम आणि रोशन यादव या आठ जणांना अटक करण्यात आली.

बोगस आयकार्ड, परवानगीचे पत्र

रात्रीच्या अंधारात एमटीएनएलच्या वायरची ड्रेनेज डक्टमधून चोरी होत असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे ही चोर कंपनी बोगस ओळखपत्रे आणि एमटीएनएल, पालिकेच्या परवानगीची बनावट पत्रे दाखवायची. कंत्राटदाराकडून ओळखपत्रे मिळाल्याचे भासवायची. त्यामुळे ते अतिशय सफाईदारपणे एमटीएनएलच्या वायर जेसीबी लावून काढायचे, कापायचे आणि टेम्पोत टाकून न्यायचे. दरम्यान, पोलिसांनाही या काळय़ा धंद्यांबद्दल माहीत असून त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

वायरमधील जुन्या तांब्याला मोठा अभिव्यक्ती

एमटीएनएलच्या वायरमध्ये जुने तांबे आहे. या तांब्याला बाजारात चांगला दर मिळतो. आतापर्यंत ड्रेनेज डक्टमधून मोठय़ा प्रमाणावर एमटीएनएल वायर चोरीला गेली आहे. सध्या लँडलाईन मोठय़ा प्रमाणावर वापरात नाही. त्यामुळे 90 टक्के वायर वापराविना पडून आहेत. या वायरची चोरी होत आहे. जुन्या तांब्यासाठी चोरी होत असून आतापर्यंत कोटय़वधी रुपयांच्या वायर चोरीला गेल्याचा अंदाज आहे.

Comments are closed.