विजेचा लपंडाव, रोज चार तास वीज गायब; महावितरणच्या रामभरोसे कारभाराने डोंबिवलीकर हैराण

वीज -1

डोंबिवली पश्चिम येथील गरीबाचा वाडा, महाराष्ट्रनगर, गोपीनाथ चौक परिसरात काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी चार तास वीज खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सततच्या या समस्येमुळे अनेक व्यापारी, घरगुती ग्राहक आणि कामकाजावर परिणाम होत असून महावितरणकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

महावितरणच्या गरीबाचा वाडा विभागांतर्गत येणाऱ्या महाराष्ट्रनगर व गोपीनाथ चौक परिसरात सकाळी दहा वाजता वीज गेल्यानंतर दीड ते दोन तास गायब होते. त्यानंतर वीज सुरू झाली तरी दिवसभर वारंवार लपंडाव सुरू राहतो. संध्याकाळी पुन्हा दोन तास वीज नसते. नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयात धाव घेतली तरी अधिकारी भेटत नाहीत, कार्यालयातील दूरध्वनी उचलले जात नाहीत, अधिकारी – कर्मचाऱ्यांचे मोबाईल बंद असतात. त्यामुळे वीज ग्राहकांमध्ये संताप आहे. सोमवारी संध्याकाळी सहा वाजता खंडित झालेला गरीबाचा वाडा फिडरचा वीजपुरवठा रात्री पावणे नऊ वाजता सुरू झाला तर बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता खंडित झालेली वीज साडेअकरा वाजता पूर्ववत झाली.

तांत्रिक दोष दूर करण्यात महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. डोंबिवलीत अनेक कार्यालयीन कर्मचारी घरून काम करत असून सकाळच्या वेळेसच वीज गेल्याने त्यांचे काम ठप्प होते. गरीबाचा वाडा भागातील अनेक गाळ्यांमध्ये गृहउद्योग आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यास या व्यवसायांवर थेट परिणाम होतो.

जुनाट वीज यंत्रणा गरीबाचा वाडा भागात जुनाट वीज
वाहिन्यांचे जाळे आहे. मुसळधार पाऊस किंवा खोदकामामुळे हे जाळे वारंवार खराब होते आणि वीज खंडित होते. त्यातच नवीन इमारतींमध्ये विकासकांनी तात्पुरते वीज मीटर लावून अनधिकृत वीज जोडण्या दिल्यामुळे वीजवाहिन्यांवर अतिरिक्त भार पडून वारंवार वीज गायब होते.

Comments are closed.