भारतीय सीमेवर नेपाळी कैद्यांना अटक

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

नेपाळमध्ये ओली सरकारच्या पतनानंतरही हिंसाचार होतच आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत काठमांडू येथील त्रिभुवन कारागृहातील अनेक कैद्यांनी कारागृह भेदून पलायन केले आहे. त्यांच्यापैकी काही जणांनी भारतात घुसण्याचा प्रयत्न केला असून त्यांना भारतीय सीमेवर उत्तर प्रदेश पोलीसांनी अटक केली आहे. त्यांची संख्या पाच असल्याची माहिती देण्यात आली आहे.

नेपाळमध्ये आता तेथील सेनेने सूत्रे हाती घेतली आहेत. देशातील महत्वाच्या आस्थापनांना आता सेनेचे संरक्षण मिळत आहे. सेनेने राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही संरक्षण देण्यास प्रारंभ केला असून लोकांना शांततेचे आवाहन केले आहे. तरीही हिंसाचाराला अद्यापही खंड पडलेला नाही. बळींची संख्या आता 28 झाली आहे. नेपाळमध्ये अनेक खासगी घरांनाही आगी लावण्यात येत असून बँका लुटण्याचे सत्रही थांबलेले नाही, अशी माहिती नेपाळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या देशातील युवकांनी लहान लहान सशस्त्र दले स्थापन केली असून त्यांच्या साहाय्याने सरकारी आस्थापने त्यांच्याकडून स्वत:च्या हाती घेण्यात येत आहेत.

सशस्त्र सीमा दलाची कारवाई

उत्तर प्रदेशातील सिद्धार्थ नगर येथे भारत-नेपाळ सीमा ओलांडून भारतात येण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेपाळच्या पाच कैद्यांना सशस्त्र सीमा दलाच्या सैनिकांनी अटक केली आहे. त्यांची चौकशी केली जात असून नेपाळमधील परिस्थिती शांत झाल्यानंतर त्यांना त्या देशाच्या आधीन केले जाण्याची शक्यता आहे.

Comments are closed.