हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीविरोधात शिवसेना महिला आघाडीचं ‘सिंदूर रक्षा’ आंदोलन; मोदींना घराघरातून सिंदूर पाठवणार! – संजय राऊत

हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष रस्त्यावर उतरणार आहे. येत्या रविवारी शिवसेना महिला आघाडी सिंदूर रक्षा आंदोलन करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घराघरातून सिंदूर पाठवणार असल्याची माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी एक्स पोस्ट करून दिली आहे.

आशिया कपमध्ये येत्या 14 सप्टेंबर रोजी हिंदुस्थान-पाकिस्तान सामना होत आहे. या सामन्याला शिवसेनेने विरोध केला आहे. जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 माता-भगिनींनी आपले कुंकू गमावले. त्यांचा आक्रोश अजूनही सुरूच आहे. पाकिस्तानविरोधात सुरू झालेले ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही. तरीही अबूधाबीमध्ये 14 सप्टेंबरला हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामना खेळला जात असून भाजपच्या मंत्र्यांचे मुलं हा सामना पाहण्यासाठी नक्कीच जातील, हा थेट देशद्रोह आहे, असे संजय राऊत एक्स पोस्टमध्ये म्हणाले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडी रविवारी हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीविरोधात ‘सिंदूर रक्षा’ आंदोलन करणार आहे. महाराष्ट्रातील हजारो महिला घराघरातून पंतप्रधान मोदींना सिंदूर पाठवणार आहे. सिंदूरच्या सन्मानार्थ शिवसेना मैदानात उतरणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

Comments are closed.