आजवर कुणी केलं नव्हतं, अभिषेक शर्मानं टी20 इतिहासात केला अद्वितीय कारनामा
बुधवारी आशिया कपमध्ये भारताच्या यूएई विरुद्धच्या पहिल्या सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्माने इतिहास रचला. त्याने आजपर्यंत टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही भारतीय फलंदाजाने नकेलेले काम केले. त्याने डावाची सुरुवात केली आणि पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. अशाप्रकारे, तो टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज बनला.
तसे, याआधीही तीन भारतीयांनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याचा चमत्कार केला आहे. परंतु तिन्ही वेळा भारत लक्ष्याचा पाठलाग न करता प्रथम फलंदाजी करत होता.
भारताने बुधवारी आशिया कपमध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात केली. कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डावखुरा लेग-स्पिनर कुलदीप यादवच्या घातक गोलंदाजीमुळे संपूर्ण यूएई संघ 13.1 षटकात फक्त 57 धावा काढून बाद झाला. कुलदीप यादवने 4 बळी घेतले. शिवम दुबेने 3 बळी घेतले. जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
भारताला जिंकण्यासाठी फक्त 58 धावांचे माफक लक्ष्य मिळाले. अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल ही सलामी जोडी मैदानात आली. युएईकडून हैदर अलीने गोलंदाजीला सुरुवात केली. शर्माने आपला पहिलाच चेंडू थेट मिड-ऑफवर उचलून षटकार मारला.
अशाप्रकारे, अभिषेक शर्मा लक्ष्याचा पाठलाग करताना टी-20 डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारा भारतीय क्रिकेट इतिहासातील पहिला फलंदाज ठरला. टी20 मध्ये भारतीय डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याचा पराक्रम करणारा तो चौथा फलंदाज ठरला. यापूर्वी 2021 मध्ये रोहित शर्माने अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. त्यानंतर 2024 मध्ये हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध यशस्वी जयस्वालने हे केले. या वर्षी मुंबईत इंग्लंडविरुद्ध संजू सॅमसनने डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. जेव्हा रोहित, जयस्वाल आणि सॅमसनने हे पराक्रम केले तेव्हा भारत लक्ष्याचा पाठलाग करत नव्हता, तर सामन्यात प्रथम फलंदाजी करत होता.
या सामन्यात अभिषेक शर्माने फक्त 16 चेंडूत 30 धावा केल्या. त्याने त्याच्या डावात 2 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याच्या बाद झाल्यानंतर, उपकर्णधार शुबमन गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव नाबाद राहिले आणि पाचव्या षटकातच भारताला 9 विकेटने विजय मिळवून दिला.
Comments are closed.