भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार, ‘ती’ याचिका फेटाळली
भारत-पाकिस्तान सामन्यावरील सर्वोच्च न्यायालय: येत्या 14 सप्टेंबरला दुबईमध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान टी-20 क्रिकेट सामन्यावर बंदी घालावी, यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने सुनावणी करण्यास नकार दिला आहे. “सामना होऊ द्या. आम्ही कोणतीही बंदी घालणार नाही,” असे कोर्टाने स्पष्टपणे सांगितले आहे.
चार एलएलबी (कायद्याच्या) विद्यार्थिनींनी, उर्वशी जैन यांच्या नेतृत्वाखाली याबाबत याचिका दाखल केली होती. त्यांनी याचिकेत पहलगाम येथील अतिरेकी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ देत पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणे राष्ट्रीय भावना आणि प्रतिष्ठेचा अपमान असल्याचे म्हटले होते.
गुरुवारी (11 सप्टेंबर २०२५) कोर्टात तातडीच्या सुनावणीसाठी अर्ज करण्यात आला होता. भारत-पाकिस्तान सामना 14 सप्टेंबरला दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हे प्रकरण न्यायमूर्ती जे. के. महेश्वरी आणि न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांच्या खंडपीठासमोर मांडण्यात आले.
कोर्टात काय घडलं?
याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टास विनंती केली की, “सामना रविवारचा असल्याने, याचिका शुक्रवारपर्यंत यादीत घ्यावी”. मात्र, कोर्टाने स्पष्टपणे सांगितले की, “सामना रोखण्याचा आमचा कोणताही विचार नाही.” पुन्हा विनंती केल्यानंतरही कोर्टाने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.
याचिकेतील मुद्दे काय होते?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट हे मैत्री आणि सलोख्याचं प्रतीक असतं, पण अलीकडील पहलगाम अतिरेकी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर अशा देशाशी सामना खेळणे, ज्याने अतिरेकींना आसरा दिला आहे, हे चुकीचा संदेश देणारे आहे. जेव्हा आपले सैनिक देशासाठी बलिदान देत आहेत, तेव्हा आपण अशा देशासोबत सामना खेळून उत्सव साजरा करतो, हे योग्य नाही. पाकिस्तानी अतिरेकी हल्ल्यात प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. राष्ट्राची प्रतिष्ठा आणि नागरिकांचा सुरक्षा हेच सर्वोच्च प्राधान्य असायला हवं, केवळ करमणूक नव्हे, असे याचिकेत म्हटले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार दिला आहे.
सामना ठरल्याप्रमाणेच होणार
14 सप्टेंबरला दुबईमध्ये होणारा भारत-पाकिस्तान टी-20 एशिया कप क्रिकेट सामना नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या सामन्यावर कोणताही कायदेशीर अडथळा उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.
भारत-पाक सामन्यावरून राऊतांची भाजपवर टीका
संजय राऊत यांनी म्हटले होते की, शिवसेनेची महिला आघाडी 14 तारखेला रस्त्यावर उतरणार आहे. ‘माझं कुंकू-माझा देश’ असा आंदोलन केलं जाईल. “सिंदूर के सन्मान मै, शिवसेना मैदान मै’ असे आंदोलन असणार आहे. मोदींना महिला सिंदूर पाठवतील. ते अभियान सुद्धा आम्ही राबवणार आहोत. या मॅचचा निषेध आमचा पक्ष करेल. हा एक प्रकारे देशद्रोहच आहे. भाजपच्या नेत्यांची पोरं अबुधाबीला मॅच बघायला जातील. जय शाह तर क्रिकेटचे सर्वेसर्वा आहेत. अमित शाह आम्हाला राष्ट्रभक्तीच्या गोष्टी शिकवतात. आम्ही मूळ विचारापासून दूर गेलो, असे म्हणतात. आम्ही मूळ विचारापासून दूर गेलेलो नाही. तुम्हाला लाजा वाटत नाही का? अरे तुम्ही तुमचे तोंड तरी उघडा. विरोध तरी करा. तुम्ही हिंदुत्ववादी आहात ना, असे म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता.
नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर पलटवार
भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत संजय राऊतांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “राऊतांनी ‘माझं कुंकू माझा देश’ अभियानाची घोषणा केली आहे. पण देशप्रेमाचं हे ढोंग करणं योग्य नाही. कारण जेव्हा लोकसभा निवडणुका होत्या तेव्हा त्यांच्या मिरवणुकांमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले, हिरवे गुलाल उधळले गेले, दहशतवादी प्रकरणांमध्ये दोषी ठरलेले लोक त्यांच्या प्रचारासाठी आले – तेव्हा देश आठवला नाही. आज मात्र क्रिकेट सामन्यावरून अचानक देशप्रेम आठवतंय. त्यामुळे तुम्हाला ‘माझं कुंकू माझा देश’ नव्हे तर ‘माझा जावेद, माझी बिर्याणी’ असं अभियान चालवावं लागेल,” अशी टीका नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर केलीय.
https://www.youtube.com/watch?v=HX9KMYFKX9Q
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.