Asia Cup: आशिया कप 2025 मध्ये वॉशिंग्टन सुंदरचा मोठा निर्णय, जाणून घ्या आता ‘या’ संघासाठी खेळणार!

भारतीय स्टार अष्टपैलू वॉशिंगटन सुंदरने (Washington Sundar) आशिया कपच्या मध्यातच मोठा निर्णय घेतला आहे. सुंदर आता काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळणार असून वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी दोन काउंटी सामने खेळून सराव करणार आहे.

सुंदरने अलीकडेच इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत जबरदस्त कामगिरी केली होती. फलंदाजी व गोलंदाजी दोन्हीमध्ये त्याने चमक दाखवली. त्यानंतर आता तो काउंटी स्पर्धेतून आपली तयारी अधिक मजबूत करण्याच्या तयारीत आहे.

सुंदरने हॅम्पशायर संघासाठी 2 काउंटी सामने खेळण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्याच्या आगामी कसोटी सत्रासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आर. अश्विनच्या निवृत्तीनंतर भारतीय कसोटी संघात आपली जागा पक्की करण्याची मोठी संधी सुंदरसमोर आहे.

सुंदर याआधी 2022 मध्ये लँकाशायर संघासाठी खेळला होता, मात्र यंदा 2025 मध्ये तो हॅम्पशायरकडून मैदानात उतरणार आहे. हॅम्पशायरचे क्रिकेट डायरेक्टर जाइल्स व्हाईट यांनी सुंदर संघात सामील झाल्याने आनंद व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, इंग्लंडविरुद्ध सुंदरची मालिका अप्रतिम झाली होती. आता समरसेट आणि सरेविरुद्धच्या दोन महत्त्वाच्या सामन्यांमध्ये तो निर्णायक भूमिका बजावेल.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सुंदरने 4 सामन्यांत 1 शतक झळकावत 284 धावा केल्या आणि 7 विकेट्स घेतल्या. आत्तापर्यंत त्याने भारतासाठी 13 कसोटी सामन्यांत 44.2 च्या सरासरीने 752 धावा केल्या असून 50.6 च्या सरासरीने 32 विकेट्सही घेतल्या आहेत.

Comments are closed.