संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, ट्रक अन् टेम्पोची समोरासमोर धडक; टँकरखाली दबून दोघे ठार
जगप्रसिद्ध अजंठा वेरुळ लेणी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामुळे वेरुळ लेणीमार्ग बंद करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर-धुळे रोडवर हा अपघात झाल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कारण, या मार्गावर मोठा टँक रस्त्यावर आडवा पडल्याने वाहतूक बंद झाली आहे.

धुळे रोडवरील वेरुळ लेणी मार्गावर आयशर टेम्पो आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या टेम्पोमधून वाहतूक करण्यात येणारा टँक रस्त्यावर पडल्याने मोठी दुर्दैवी घटना घडली.

या टेम्पोमधील टाकी खाली पडून 2 दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक महिला आणि एक पुरुष असल्याचे दिसून येते. दोघांचीही ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

ट्रकच्या धडकेत टेम्पोमधील टँक रत्यावर पडल्याने वाहतूक बंद झाली असून जगप्रसिद्ध वेरूळ लेनीचा रस्ता बंद झाल्याने वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे.

टेम्पोतून खाली पडलेल्या टँकरखाली एक चारचाकी वाहनही दबले आहे, त्यामुळे चारचाकी कारचेही नुकसान झाल्याचं फोटोत दिसून येत आहे.

वाहतूक पोलिसांनी बॅरिकेटस लावून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे.

पोलीस व प्रशासनाकडून क्रेनच्या सहाय्याने हा टँक हटविण्याचे काम हाती घेण्यात आलं असून टँक हटविल्यानंतरच येथील मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाईल.
येथे प्रकाशितः 11 सप्टेंबर 2025 06:55 दुपारी (आयएसटी)
छत्रपती संभाजी नगर फोटो गॅलरी
आणखी पाहा
Comments are closed.