अटल सेतूवर जाणारा रस्ता 20 फूट खचला! दीड वर्षापूर्वी मोदींनी केले होते उद्घाटन, एमएमआरडीए, पालिका, बीपीटीमध्ये समन्वयाचा अभाव

दीड वर्षापूर्वी मोठा दिखावा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाहतुकीसाठी खुला केलेल्या अटल सेतूवर जाणारा शिवडीतील रस्ता तब्बल 20 फूट लांब खचल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यातील एमएमआरडीए, मुंबई महापालिका आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट या यंत्रणांतील समन्वयाच्या अभावामुळे ही घटना घडल्याने नागरिक, वाहनचालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
दक्षिण मुंबईहून शिवडी येथून नवी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर खोल खड्डा पडला आहे. हा भाग मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारित आहे. मात्र शेजारील नाल्याचे काम मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येते. रस्त्याच्या दुरवस्थेकडे शिवसेनेने वेळोवेळी लक्ष वेधले होते. तथापि, तीन यंत्रणांनी एकमेकांकडे बोटे दाखवून टोलवाटोलवी केल्याने अखेर रस्ताचा 20 फूट लांब भाग खचला. शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी ही घटना तातडीने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.
शिवसेनेने प्रशासनाला विचारला जाब
रस्ता खचल्यानंतर सुस्त राहिलेल्या एमएमआरडीए व इतर सरकारी यंत्रणांना शिवसेनेने जाब विचारला. शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी मुंबई महापालिका, मुंबई पोर्ट ट्रस्ट, एमएमआरडीए, शिवडी पोलीस, वडाळा वाहतूक विभाग पोलीस अधिकारी या यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना सदर ठिकाणी बोलावले आणि वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. रस्त्याच्या दुरवस्थेच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, खड्डय़ांमुळे शिवडीकडे जाणारा मार्ग बंद झाल्यामुळे होणाऱ्या वाहतूककोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वडाळा वाहतूक विभाग, मुंबई पोर्ट ट्रस्ट यांनी अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, पालिकेने ढासळलेल्या नाल्यावरील भाग पुन्हा बांधून घ्यावा, खड्डय़ातून नाल्यात पडलेला स्लॅब काढावा, पावसाळी पाण्याचा निचरा थांबणार नाही, अशा मागण्या शिवसेनेने केल्या. यावेळी शाखाप्रमुख बैजू हिंदोळे, शिवडी पूर्व विभागातील पदाधिकारी, स्थानिक नागरिक उपस्थित होते.
Comments are closed.