हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याला असाही विरोध, ब्लॉकबस्टर क्रिकेट युद्धाकडे प्रेक्षकांची पाठ; तिकीटविक्रीला थंड प्रतिसाद

हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा क्रीडा विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय सामन्यांपैकी एक. या सामन्याची अवघे विश्व आतुरतेने वाट पाहत असते. मात्र यंदा पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या सामन्याला प्रचंड विरोध होऊ लागला आहे. पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळू नये म्हणून हिंदुस्थानात प्रचंड विरोध असतानाही हा सामना खेळविला जात आहे. मात्र आता या सामन्याला हिंदुस्थानी प्रेक्षकांनी आगळ्या पद्धतीने विरोध दर्शवल्याचे समोर आलेय. ज्या सामन्याची तिकिटे चार मिनिटांत विकली जातात, तो सामना रविवारी खेळविला जाणार आहे आणि त्याची हजारो तिकिटे अजूनही शिल्लक आहेत. ही थंड तिकीटविक्री पाहता या सामन्याची क्रेझही कमी झाल्याचे दिसत आहे.
आशिया कपमधील हिंदुस्थान-पाकिस्तान सामना म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी नेहमीच पर्वणी ठरते. जगभरातील क्रिकेटप्रेमी या सामन्यासाठी लाखो रुपये खर्च करून सामनास्थळी पोहोचतात, पण यंदा परिस्थिती वेगळी दिसतेय. सामन्याला अवघे तीन दिवस बाकी असताना तिकिटांची विक्री अपेक्षेप्रमाणे होत नाही. आयोजकांनी तिकिटे विकली जावीत म्हणून ती क्रिकेटप्रेमींना मोठय़ा संख्येने उपलब्ध करून दिली होती; पण तिकीटविक्रीवर त्याचा फारसा फरक पडलेला नाही. या बहुप्रतीक्षित सामन्यासाठी खालचे स्टॅण्ड विकले गेले असले तरी वरचे व प्रीमियम स्टॅण्ड अजूनही उपलब्ध आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीमुळेच हा उत्साह कमी झाला असावा, असे यूएई क्रिकेटच्या अधिकाऱ्याचे मत असले तरी पहलगाम हल्ल्याचाही या सामन्यांवर प्रभाव पडल्याचे दिसत आहे.
मागच्या वेळी विक्रीचा धडाका
यूएई अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीत याच सामन्याची तिकिटे फक्त चार मिनिटांत संपली होती. त्या दिवशी दोन वेळा तिकिट खिडकी उघडावी लागली होती. पण यावेळी ती क्रेझ गायब झालीय. सोशल मीडियावर चाहत्यांनीही निराशा व्यक्त केली आहे. प्रीमियम सीटची किंमत प्रचंड असल्याने अनेक चाहत्यांनी अंतिम क्षणी स्वस्त तिकिटे जारी करावीत, अशी मागणी केली आहे. दोन प्रीमियम तिकिटांची किंमत तब्बल 2.5 लाख रुपयांहून अधिक ठेवण्यात आली आहे, ज्याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.
हिंदुस्थानचा मजबूत प्रवास
हिंदुस्थानने बुधवारच्या सामन्यात यूएईचा धुव्वा उडवला. 19 सप्टेंबरला अबुधाबी येथे ओमानविरुद्ध गटातील शेवटचा सामना खेळणार आहे. त्यानंतर स्पर्धा सुपर-4 टप्प्यात जाईल. जर हिंदुस्थान गटात अव्वल स्थानी राहिला तर सर्व सुपर-4 सामने दुबईत खेळले जातील. दुसऱ्या क्रमांकावर राहिल्यास एक सामना अबुधाबीला आणि दोन सामने दुबईला होतील. 28 सप्टेंबरला दुबईत अंतिम सामना रंगणार आहे.
Comments are closed.