रशियन लष्करी भरतीच्या जाळ्यात पडू नका

भारत सरकारने दिला सल्ला : रशियाला देखील केले आवाहन

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

रशियाच्या सैन्यात सामील होण्याच्या कुठल्याही सापळ्यात अडकू नका असा सल्ला केंद्र सरकारने भारतीय नागरिकांना दिला आहे. अशाप्रकारच्या कुठल्याही ऑफरचा स्वीकार करू नका, कारण ती धोकादायक आहे असे विदेश मंत्रालयाने ट्विट करत सांगितले आहे. तसेच सरकारने रशियाच्या सैन्यात सामील झालेल्या भारतीयांना परत पाठविण्याचे आवाहन रशियाला केले आहे. भारतीय नागरिकांनी अशाप्रकारच्या प्रस्तावांपासून दूर रहावे, कारण यात धोका आहे. अलिकडेच आम्ही रशियाच्या सैन्यात भारतीय नागरिकांची भरती झाल्याचे वृत्त पाहिले आहे. सरकारने मागील एक वर्षात अनेकदा अशाप्रकारच्या कारवाईत असलेली जोखीम आणि धोक्यांविषयी सांगत लोकांना यापासून दूर राहण्याचा इशाराही दिला असल्याची माहिती विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी दिली.

दिल्ली आणि मॉस्को दोन्ही ठिकाणी रशियाच्या अधिकाऱ्यांसमोर हा मुद्दा आम्ही उपस्थित केला आहे. रशियाच्या सैन्यात भारतीयांना सामील करण्याचा प्रकार थांबवावा आणि आमच्या नागरिकांना परत पाठविण्यात यावे अशी विनंती आम्ही रशियाला केली आहे. प्रभावित भारतीय नागरिकांच्या परिवारांसोबत आम्ही संपर्कात आहोत. रशियाच्या सैन्यात सामील होण्याच्या कुठल्याही ऑफरपासून दूर रहा असा आग्रह आम्ही सर्व भारतीय नागरिकांना पुन्हा करत आहोत असे जायस्वाल यांनी म्हटले आहे. मागील तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून युक्रेनसोबत युद्ध करत असलेल्या रशियाच्या सैन्यामध्ये वेळेवेळी भारतीय नागरिकांची भरती होत राहिली आहे. रशियाच्या सैन्यात भरती झाल्यावर भारतीयांना परत जाण्यापासून रोखले जात असल्याचे संबंधितांच्या परिवारांचे सांगणे आहे.

व्हिजिटर व्हिसावर रशियात

पूर्व युक्रेनच्या डोनेट्स्क क्षेत्रात असलेल्या भारतीयांना निर्मितीकार्याच्या निमित्ताने  रशियात नेण्यात आले, परंतु तेथे त्यांना युद्धाच्या आघाडीवर तैनात करण्यात आले होते. या भारतीयांना बांधकाम क्षेत्रात रोजगाराचे आश्वासन एका एजंटकडून देण्यात आले होते, परंतु फसवणूक करत त्यांना युद्धक्षेत्रात लोटण्यात आल्याचे एका प्रकरणातून समोर आले आहे.

Comments are closed.