खाकी वर्दीने वाचवले महिलेचे प्राण; नागोठण्याचे पोलीस ठरले देवदूत, सचिन कुलकर्णी यांचा ग्रामस्थांनी केला गौरव

कौटुंबिक वादातून आत्महत्या करण्यासाठी नागोठण्याच्या ऐतिहासिक पुलावरून अंबा नदीत उडी मारणाऱ्या महिलेचे प्राण पोलिसांनी वाचवले. खाकी वर्दीतील या देवदूतांचे सोशल मीडियावर कौतुक होत असतानाच नागोठणे ग्रामपंचायतीनेही सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी आणि त्यांच्या बहाद्दर सहकाऱ्यांचा गौरव केला आहे.
२१ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास आशा गुंजाळ (२५, रा. रामनगर) या महिलेने नागोठणे-वरवठणे येथील जुन्या पुलावरून अंबा नदीत उडी मारली. याची माहिती तेथे उपस्थित असलेल्या महामार्ग पोलीस हवालदार सुनील वाघ व पत्रकार महेंद्र म्हात्रे यांनी नागोठणे पोलिसांना दिली. त्यानंतर तत्काळ पोलीस अधिकारी सचिन कुल कर्णी यांनी तातडीने आपले सहकारी महेश लांगी, स्वप्नील भालेराव व सुनील वाघ यांच्यासह धाव घेत मोठ्या हिमतीने वाहत जाणाऱ्या महिलेला वाचवले होते.
रागातून पदरी पश्चाताप येतो
नागोठणे पोलिसांच्या या कार्याची दखल घेत ग्रामपंचायतीने सचिन कुलकर्णी, पोलीस हवालदार महेश लांगी, गुन्हे शाखेचे स्वप्नील भालेराव व महामार्ग पोलीस हवालदार सुनील वाघ यांचा सत्कार केला. यावेळी सरपंच सुप्रिया महाडिक, उपसरपंच अकलाक पानसरे, माजी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, प्रकाश कांबळे, ग्रामविकास अधिकारी राकेश टेमघरे, गुड्डू पोत्रीक, सज्जाद पानसरे आदी उपस्थित होते. वाचवलेल्या महिलेने गैरसमजातून हे पाऊल उचलल्याचे सांगितले. त्यामुळे रागातून फक्त पश्चाताप पदरी येत असल्याने प्रत्येकाने रागावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन सचिन कुलकर्णी यांनी केले.
Comments are closed.