भारत-पाकिस्तान सामना होईल

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

येत्या रविवारी आशिया चषक 20-20 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्याच्या विरोधात सादर करण्यात आलेल्या याचिकेवर त्वरित सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. हा सामना होणे आवश्यक आहे, अशी टिप्पणीही न्यायालयाने प्राथमिक सुनावणीप्रसंगी केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात यशस्वी केलेले ‘सिंदूर’ अभियान यांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानशी क्रिकेटचा सामना खेळणे हे देशाची प्रतिष्ठा आणि राष्ट्रीय भावना यांच्या विरोधात आहे. त्यामुळे हा सामना खेळू नये, असा आदेश द्यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. दिल्लीतील चार कायदा विद्यार्थ्यांनी ही याचिका सादर केली आहे. विद्यार्थिनी उर्वशी जैन हिचा या याचिकेत पुढाकार असल्याचे दिसून येत आहे.

त्वरित सुनावणी करा

हा सामना येत्या रविवारी असल्याने येत्या शुक्रवारपर्यंत या याचिकेवर निर्णय झाला नाही, तर याचिका निरुपयोगी होईल. त्यामुळे ही याचिका त्वरित सुनावणीसाठी घेण्यात यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी न्या. जे. के. माहेश्वरी आणि न्या. विजय बिश्नोई यांच्या खंडपीठाला गुरुवारी केली होती. मात्र, खंडपीठाने ती मान्य करण्यास नकार दिला. रविवारी सामना आहे, तर आम्ही काय करु शकतो. सामना होऊ द्या. ही याचिका त्वरित सुनावणीस घेण्याचे कोणतेही कारण नाही, अशी टिप्पणी करत खंडपीठाने त्वरित सुनावणीस नकार दिला.

याचिकाकर्त्यांचे म्हणणे

क्रिकेट किंवा कोणत्याही खेळ हा सौहार्द आणि मित्रत्वाचे प्रतीक असतो. तथापि, भारत आणि पाकिस्तान यांच्यात तसे संबंध नाहीत. विशेषत: पहलगामचा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताचे ‘सिंदूर’ अभियान यांच्यानंतर दोन्ही देशांमध्ये असे संबंध राहिलेले नाहीत. त्यामुळे हा सामना होणे, हे राष्ट्रीय भावनेच्या विरोधात आहे. तसेच देशाची प्रतिष्ठाही या सामन्यामुळे झाकोळली जाणार आहे. दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेले लोक भारताचे नागरीक होते. तसेच त्यांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी आपल्या देशाच्या सैनिकांनी सर्व धोका पत्करुन कारवाई केली आहे. अशा स्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाल्यास एक अत्यंत चुकीचा संदेश समाजात जाऊ शकतो. ज्या देशाने आमची माणसे मारली आणि ज्या देशाशी आमच्या सैनिकांनी प्राण पणाला लावून संघर्ष केला, त्याच देशाशी आम्ही क्रिकेटचा सामना खेळण्याचा आनंद लुटत आहोत, ही बाब अत्यंत आक्षेपार्ह आणि अयोग्य आहे, असेही या विद्यार्थी याचिकाकर्त्यांनी त्यांच्या याचिकेत प्रतिपादन केले आहे. न्यायालयाने ही याचिका सादर करुन घेतली. मात्र, तिच्यावर त्वरित सुनावणी करण्यास नकार दिल्याने रविवारनंतर या याचिकेचे महत्वच संपणार आहे. ही एक जनहित याचिका आहे.

देशहिताच्या विरोधात

पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याचे भारताचे धोरण अस्वीकारार्ह असून ते देशहिताच्या विरोधात आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात ज्या निरपराध नागरीकांचे प्राण गेले, त्यांच्या आप्तेष्टांच्या आणि कुटुंबियांच्या भावना हा सामना खेळण्याच्या धोरणामुळे दुखावल्या जाणार आहेत. सामन्यामधून जे मनोरंजन होईल, त्याच्यापेक्षा देशभावना आणि देशाची प्रतिष्ठा यांचे मूल्य मोठे आहे, असेही प्रतिपादन या याचिकेत याचिकाकर्त्यांनी केल्याची माहिती देण्यात आली आहे.

Comments are closed.