नोव्हेंबरपर्यंत भारत-यूएस करार

केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांची माहिती

दोन्ही देश पुन्हा सान्निध्यात…

  • भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध पुन्हा बळकट होण्याच्या मार्गावर
  • लवकरच व्यापक व्यापारी कराराचा प्रथम भाग पूर्ण होण्याची दाट शक्यता
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यात चर्चेचीही शक्यता

वृत्तसंस्था/पाटणा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी सकारात्मक संकेत दिल्यानंतर आता भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार होण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. या व्यापक कराराचा प्रथम भाग येत्या नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केला जाईल, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी दिली आहे. दोन्ही देशांमध्ये परस्परपूरक अशा व्यापार करारावर चर्चा होत असून ती लवकरच सुफळ होणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. गोयल यांनी ही माहिती बिहारची राजधानी पाटणा येथे पत्रकार परिषदेत गुरुवारी दिली.

येत्या नोव्हेंबरपर्यंत भारत आणि अमेरिका यांच्यात एक सुयोग्य असा करार पूर्ण झाला पाहिजे, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप या दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांच्या संबंधित मंत्र्यांना केली आहे. त्यानुसार आम्ही वेगाने या कराराचे प्रारुप सज्ज करण्याच्या मार्गावर आहोत. दोन्ही देशांमध्ये गेल्या मार्च महिन्यापासून अशा व्यापार करारासंदर्भात चर्चा होत आहे. ही चर्चा अत्यंत गंभीरपणे आणि अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात होत आहे. चर्चा प्रगतीपथावर असून आतापर्यंतच्या वाटाघाटी दोन्ही देशांचे समाधान करणाऱ्या आहेत, अशी सकारात्मक आणि विश्वास वाढविणारी माहिती गोयल यांनी दिली.

संबंध बळकट होण्याच्या स्थितीत

भारतावर 50 टक्के व्यापारशुल्क आकारण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी 27 ऑगस्टला केली होती. त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध तणावग्रस्त झाले होते. त्यानंतर दोन आठवड्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप या दोन्ही नेत्यांनी संबंध सुधारत असल्याचे संकेत दिले होते. दोन्ही नेत्यांची मैत्री अबाधित असून दोन्ही देश व्यापारी करार करण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहेत, असे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे मधल्या काळात निर्माण झालेला तणाव बराचसा दूर होण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार कराराच्या दृष्टीने चर्चा होत आहे, अशी घोषणा अध्यक्ष ट्रंप यांनीच दोन दिवसांपूर्वी केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा हे दोन्ही धोरणात्मक भागीदारी असलेले देश एकमेकांच्या नजीक आले आहेत.

होत आहे चर्चा…

अमेरिकेच्या 50 टक्के व्यापार शुल्कामुळे दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा थंडावल्याची वृत्ते प्रसारित होत असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी मंगळवारी, ही चर्चा होत आहे, अशी घोषणा केली. तसेच ही घोषणा करताना मला समाधान वाटत आहे, अशी आश्वासक टिप्पणीही केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी चांगले मित्र आहोत, असेही ट्रंप यांनी त्यांच्या ‘ट्रूथ सोशल’ या माध्यमावर स्पष्ट केले. दोन्ही देशांमध्ये व्यापार करार होण्यात कोणताही अडथळा नाही, अशी टिप्पणी त्यांनी केल्याने सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

लवकरात लवकर करार…

भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांची प्रतिनिधीमंडळे सातत्याने एकमेकांच्या संपर्कात असून दोन्ही देशांमध्ये एक उत्तम असा व्यापारी करार करण्याच्या दिशेने अग्रेसर होत आहेत. भारत आणि अमेरिका यांच्या धोरणात्मक आणि व्यापारी भागीदारीची क्षमता अमर्याद आहे. दोन्ही देशांना या क्षमतेचा लाभ व्हावा, यासाठी अनुकूल ठरेल, अशी चर्चा दोन्ही देशांमध्ये होत आहे. तसेच लवकरात लवकर ही चर्चा पूर्ण होऊन सर्वंकष व्यापारी करार व्हावा, हा दोन्ही देशांचा प्रयत्न आहे. मी स्वत: लवकरच अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी चर्चा करण्यास उत्सुक आहे, अशा अर्थाचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘एक्स’वर प्रसारित केला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील चर्चा आता पुढे गेली असून ती पूर्ण होईल आणि एक करार अस्तित्वात येईल, ही शक्यता बळावली आहे, असे अनेक तज्ञांचे मत आहे.

Comments are closed.