सरकारने ओबीसी समाजाचा विश्वासघात केला, लातूरमधील तरुणाच्या मृत्यूला महायुती सरकार जबाबदार! – विजय वडेट्टीवार

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदारी गावातील भरत कराड या ३५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. हे वृत्त धक्कादायक आहे. ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निराशेने या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. गेले काही दिवस मुख्यमंत्र्यांपासून ते ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष सांगत आहे की सरकारच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या हक्कावर गदा येणार नाही पण हाच सरकारचा विश्वासघात आहे, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या जीआरमध्ये आधी पात्र हा शब्द होता आणि अवघ्या काही तासात दुसरा जीआर काढून त्यातून पात्र हा शब्द वगळण्यात आला, इथेच ओबीसी समाजाचा घात सरकारने केला. सरकार आणि त्यांचे मंत्री वारंवार ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी भाषा करत असले तरी सत्य मात्र वेगळ आहे. आणि हे आता जनतेला कळले आहे यातूनच निराशा येत आहे. अनेक ठिकाणी तर मंत्र्यांपासून संत्र्यानी ओबीसी प्रमाणपत्र मिळावल्याची चर्चा सुरू आहे. आता जर धनाढ्य मंत्र्यांनी पण ओबीसी आरक्षणात घुसखोरी केली तर सामान्य ओबीसींच्या अधिकाराला हा धक्का नाही का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
Comments are closed.