Dulip Trophy: रजत पाटीदारची शानदार खेळी, जाणून घ्या फक्त इतक्या चेंडूत झळकावले शतक!

सध्या दुबईत आशिया कप 2025 (Asia Cup 2025) स्पर्धा सुरू आहे, तर दुसरीकडे भारतात घरेलू स्पर्धा दुलीप ट्रॉफी 2025 (Dulip Trophy) सुरू आहे. बेंगळुरूच्या बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स मैदानावर सुरू असलेल्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशचा स्टार फलंदाज रजत पाटीदारने (Rajat patidar) कमाल दाखवली. सेंट्रल झोनकडून खेळताना त्याने कर्णधाराची जबाबदारी सांभाळत दमदार शतक ठोकले आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. रजतने साऊथ झोनविरुद्ध केवळ 112 चेंडूत शतक झळकावले. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 2 षटकार ठोकले. ही त्याच्या फर्स्ट क्लास करिअरमधील 15वी सेंच्युरी ठरली.

या डावात रजतला एकदा जीवनदान मिळाले. जेव्हा तो 43 धावांवर होता, तेव्हा अंकित शर्माच्या गोलंदाजीवर तो एलबीडब्ल्यू झाला होता. पंचांनी त्याला बादही दिलं होतं, पण तपासल्यावर तो नो बॉल निघाला आणि रजत वाचला. त्यानंतर त्याने आक्रमक खेळ दाखवला. सुरुवातीला 73 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि पुढे 112 चेंडूत शतक झळकावले. मात्र शतकानंतर तो फारशी मोठी खेळी करू शकला नाही आणि 115 चेंडूत 101 धावा करून तो बाद झाला. या डावात त्याने 12 चौकार आणि 2 षटकार मारले.

दुलीप ट्रॉफी 2025 मध्ये सेंट्रल झोनचा कर्णधार रजत पाटीदार भन्नाट फॉर्ममध्ये दिसला. फायनलपूर्वी त्याने 2 सामने खेळले होते आणि दोन्ही वेळा कमालची खेळी केली होती. 3 डावांत त्याने 2 अर्धशतकं आणि 1 शतक अशी कामगिरी केली. याच उत्कृष्ट फलंदाजीमुळे सेंट्रल झोन फायनलमध्ये पोहोचला. दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये रजतने नॉर्थ ईस्ट झोनविरुद्ध 96 चेंडूत 125 धावा ठोकल्या होत्या, ज्यात 21 चौकार आणि 3 षटकार होते. दुसऱ्या डावात त्याने 72 चेंडूत 62 धावा केल्या. नंतर सेमीफायनलमध्ये त्याने 84 चेंडूत 77 धावा केल्या. आता फायनलमध्ये त्याने 115 चेंडूत 101 धावा जोडल्या.

Comments are closed.