हरभजन सिंगला बीसीसीआयमध्ये मोठं पद मिळणार? आशिया कपदरम्यान चाहत्यांमध्ये खळबळ निर्माण!

भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगला (Indian Former Cricketer Harbhajan Singh) भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (BCCI) मोठं पद मिळण्याची शक्यता आहे. बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा (BCCI AGM 2025) 28 सप्टेंबरला होणार आहे. या बैठकीसाठी पंजाब क्रिकेट असोसिएशनने हरभजन सिंग यांना आपला प्रतिनिधी म्हणून जाहीर केले आहे. द इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, हरभजन सिंग या सभेला उपस्थित राहणार आहे. याआधी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने सौरव गांगुली (Saurav Ganguly) यांना आपला प्रतिनिधी म्हणून जाहीर केले आहे. 28 सप्टेंबरलाच बीसीसीआयची निवडणूक होणार असून त्यात अध्यक्षपदावर नवी निवड होणार आहे.

यापूर्वी हरभजन सिंगची पंजाब क्रिकेट असोसिएशनचा सल्लागार म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र, राज्य क्रिकेट संघाच्या प्रतिनिधी म्हणून तो प्रथमच दिसणार आहे. सर्व राज्य संघटनांना 12 सप्टेंबरपर्यंत आपले प्रतिनिधी जाहीर करण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती.

दरम्यान, निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबरवरून वाढवून 21 सप्टेंबर केली आहे. उमेदवार इच्छित असल्यास आपले नाव 23 सप्टेंबरपर्यंत मागे घेऊ शकतात. निवडणुका 28 सप्टेंबरलाच होतील. याच दिवशी आशिया कप 2025 चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सभेत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संयुक्त सचिव आणि कोषाध्यक्ष या पदांवर निर्णय घेतला जाणार आहे.

कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनने रघुराम भट्ट, मुंबई क्रिकेट असोसिएशनने संजय नाईक, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनकडून माजी IPL चेअरमन अरुण सिंग धूमल आणि उत्तर प्रदेशकडून राजीव शुक्ला हे वार्षिक सभेला उपस्थित राहणार आहेत.

अलीकडेच माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचं नाव बीसीसीआय अध्यक्षपदासाठी घेतलं जात होतं. या चर्चांना चांगलाच जोर मिळाला होता की, सचिन पुढचे बीसीसीआय अध्यक्ष होऊ शकतात. मात्र, नुकत्याच त्यांच्या ‘SRT Sports Management’ या कंपनीने स्पष्ट केलं की, सचिन तेंडुलकर यांना बीसीसीआय अध्यक्षपद मिळण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही आणि त्या अफवा खोट्या आहेत.

Comments are closed.