बॉम्बच्या धमक्यांमुळे सर्वोच्च न्यायालयाचा राग आला

दिल्ली-मुंबई उच्च न्यायालयात स्फोट घडवण्याच्या इशाऱ्यानंतर तपासणी

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

दिल्ली आणि मुंबई उच्च न्यायालयांना दिलेल्या गेलेल्या बॉम्बस्फोट घडविण्याच्या धमकीची गंभीर नोंद घेत सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. शुक्रवारी या दोन्ही न्यायालयांना धमकीचा संदेश आल्याने कामकाज काहीकाळ बंद ठेवावे लागले. या न्यायालयांच्या इमारती रिकाम्या करण्यात आल्या आणि कसून तपासणी करावी लागली. शुक्रवारच्या नमाजानंतर दिल्ली उच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय इमारतींमध्ये स्फोट घडविण्यात येतील, अशी धमकी देण्यात आली होती.

या घडामोडीवर आम्ही सूक्ष्म दृष्टी ठेवून आहोत. ज्या समाजकंटकांनी ही धमकी दिली असेल, त्यांना पकडून कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाने या दोन्ही उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांकडून या धमकी प्रकरणी अहवाल मागितला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या महासचिवांनी या संपूर्ण घटनाक्रमावर लक्ष ठेवून एक सविस्तर अहवाल करावा आणि तो सर्वोच्च न्यायालयाला सादर करावा, असा आदेशही सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिला आहे. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही देण्यात आला.

दिल्ली उच्च न्यायालयात धावपळ

शुक्रवारी अकस्मात दिल्ली उच्च न्यायालयाला धमकीचा दूरध्वनी आल्याने एकच धावपळ झाली. पोलिसांनी त्वरित न्यायालयाची इमारत रिकामी करण्याचा आदेश दिला. न्यायाधीश, वकील, पक्षकार आणि कर्मचारीवर्ग यांची या धमकीमुळे एकच धांदल उडाली. शुक्रवारी मशिदींमध्ये महत्वाचा नमाज असतो. तो झाल्यानंतर उच्च न्यायालयात पेरलेल्या बॉम्बस्फोट होणार आहे, अशी ही धमकी होती. तथापि, तीन तासांच्या तपासानंतर न्यायालयाच्या परिसरात कोणतीही धोकादायक वस्तू नाही, असे स्पष्ट झाल्याने साऱ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यापाठोपाठ मुंबईतील उच्च न्यायालयालाही अशाच प्रकारची धमकी देण्यात आली.

Comments are closed.