अमेरिकेची फंडिंग कपात, टीबीच्या लढाईला मोठा फटका; 5 वर्षांत मृतांचा आकडा 22 लाखांनी वाढण्याची भीती

ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेचे प्रशासन मोठे निर्णय घेऊन जगभरातील अनेक देशांना हादरे देत आहे. ट्रम्प यांनी अलीकडेच टॅरिफचा मोठा बॉम्ब टाकला. त्याआधी त्यांनी विदेशी फंडिंगमध्ये मोठय़ा कपातीची घोषणा केली. अमेरिकेच्या फंडिंगवर हिंदुस्थानसह काही देशांमध्ये राष्ट्रीय टीबी कार्यक्रम राबवले जातात. ट्रम्प यांच्या फंडिंग कपातीच्या निर्णयाचा फटका या टीबी कार्यक्रमांना बसणार आहे. परिणामी टीबीमुळे पुढील वर्षांत लाखो जास्तीचे मृत्यू होतील, असा धक्कादायक अहवाल एका जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

ज्या देशांमध्ये टीबी कार्यक्रम दीर्घकाळ चालतात, त्या देशांना फंडिंग कपातीचा फटका बसेल. या देशांमध्ये 22 लाख अतिरिक्त मृत्यू होऊ शकतात. अमेरिकेने 2024 मध्ये टीबी कार्यक्रमांसाठी विदेशी फंडातून 55 टक्क्यांहून जास्तीचे योगदान दिले होते. अमेरिकेतील अवेनिर हेल्थ आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘स्टॉप टीबी पार्टनरशीप’च्या संशोधकांनी ही माहिती दिलीय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटच्या (यूएसएआयडी) सर्व उपक्रमांसाठी 83 टक्के कपातीची घोषणा केली. यूएसएआयडी ही सामाजिक कार्यासाठी फंडिंग करणारी सर्वात मोठी एजन्सी आहे. अमेरिकेने केलेल्या फंडिंग कपातीचा टीबीचे प्रमाण जास्त असलेल्या देशांवर काय परिणाम होईल, हे जाणून घेण्याचा प्रयत्न अभ्यासकांनी केला. हिंदुस्थान, पाकिस्तान, बांगलादेश आणि आफ्रिका यासारखे अनेक देश टीबी कार्यक्रमांसाठी निधीवर अवलंबून आहेत. ‘पीएलओएस ग्लोबल पब्लिक हेल्थ’ या जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, 2025 ते 2030 या काळात 26 देशांमध्ये 107 लाख अतिरिक्त टीबीचे रुग्ण आणि 22 लाख मृत्यू होऊ शकतात.

Comments are closed.