बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर शंका घ्यायचीय का? भाजपची तेवढी लायकी आहे का? उद्धव ठाकरेंचा घणाघात

भारत-पाकिस्तान आशिया चषक सामन्यावरील उदव ठाकरे: यूएईमध्ये सध्या सुरू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत (Asia Cup 2025) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील साखळी फेरीतील सामना (India Pakistan Match)  उद्या (14 सप्टेंबर) रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, अशी मागणी करत शिवसेना उद्धव ठाकरे गट (Shiv Sena UBT) आक्रमक पवित्रा घेत आहे. मात्र, यावर भाजप नेत्यांनी पलटवार करत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद (Javed Miandad) आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यात मातोश्रीवर झालेल्या भेटीचा संदर्भ देत शिवसेनेवर टीका केली आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “आज मी अत्यंत विषण्ण मनाने बोलतो आहे,” असं सांगत उद्धव ठाकरे यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून केंद्र सरकारवर आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. “उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना होणार आहे. पण अजूनही पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे जखमांचे घाव भरलेले नाहीत, त्या हल्ल्यातील शहीद जवानांचे रक्त अजूनही सुकलेले नाही. त्या घटनेनंतर आम्हाला वाटले होते की, पाकिस्तानचे दोन-तीन तुकडे होतील. त्यावेळी एक चढाई झाली होती, त्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले होते,” असं त्यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे अजूनही संधी

“दरवेळी पाकिस्तानकडून हल्ला होतो, आपले सैनिक शौर्याने लढतात, काही जण शहीदही होतात. पण तेव्हा डोनाल्ड ट्रम्प सांगतो की, त्यांनी युद्ध थांबवलं. एकदा नीरज चोप्रा यांनी पाकिस्तानी प्रशिक्षक घेतला होता, तेव्हा त्या प्रशिक्षकाला देशद्रोही ठरवलं गेलं. आणि आता त्याच पाकिस्तानसोबत आपण क्रिकेट खेळतोय? जो पाकिस्तान सातत्याने दहशतवाद पसरवत आहे, त्याच्याशी आपण संबंध ठेवतो? मग आपण तिथे शिष्टमंडळ पाठवलं होतं का?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अजूनही संधी आहे, त्यांनी या सामन्यावर बहिष्कार घालावा आणि देशाला योग्य संदेश द्यावा,” असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

उद्धव ठाकरेंचा जय शाहांवर निशाणा

“उद्या जय शाह सामना पाहायला जातील, तर त्यांना देशद्रोही म्हणायचं का? भाजप इतकी निर्लज्ज झाली आहे की, उद्या सामना सुरू असताना जाहिरातीत ‘सिंदूर’ दाखवायला देखील कमी पडणार नाही,” असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. “उद्या होणाऱ्या आंदोलनाचं शीर्षक आहे ‘माझं कुंकू, माझा देश’. कारण क्रिकेटच्या सामन्यात विकेट गेली तर दुसऱ्या सामन्यात संधी मिळते. पण जवान शहीद झाले, तर त्यांच्या कुटुंबांचे आयुष्य उजाडून जातं. ही व्याख्या भाजपला कळत नाही,” अशी बोचरी टीका त्यांनी केली.

बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर शंका घ्यायचीय का?

उद्धव ठाकरे यांनी पाकिस्तानचा माजी खेळाडू जावेद मियाँदाद आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातील भेटीवरही भाष्य केले आहे. “जर मातोश्रीवर जावेद मियाँदादच्या येण्यावरुन भाजप टीका करत असेल तर मला विचारायचं आहे की, त्यांना बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर शंका घ्यायचीय का? भाजपची तेवढी लायकी आहे का? असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.

https://www.youtube.com/watch?v=Y61M3HGJ1EC

आणखी वाचा

Prakash Mahajan Resignation: मनसेला अचानक ‘जय महाराष्ट्र’ का केला? प्रकाश महाजनांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, दोन भाऊ…

आणखी वाचा

Comments are closed.