दखल – हृद्य आठवणी

>> प्रा? शाम जोगळेकर

'बीखर कर्ल्याची’ हे राजीव लिमये लिखित पुस्तक सत्त्वश्री प्रकाशनने प्रकाशित केले आहे. ज्येष्ठ लेखक अ‍ॅड. विलास पाटणे यांची वेधक आणि मार्मिक प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. त्यांच्या मते, आत्मचरित्राच्या अंगाने जाणाऱ्या बखरीत माणसे, निसर्ग, जनावरे, शेती याविषयीचे चलतचित्रण आपल्याला वाचायला मिळते! कोणताही अभिनिवेश न बाळगता प्रांजल निवेदनातून कर्ल्याचे चित्र आपल्याला कॅनव्हासवर अनेक रंगांत चितारलेले आढळते. ‘काजळीच्या तीरावरून’ या शीर्षकान्वये राजीव लिमये यांनी आपले मनोगत मांडले आहे. ‘स्वांत सुखाय’ केलेले हे लेखन आता पुस्तकरूपाने प्रकाशित होत आहे.

निवृत्तीचे पुढील आयुष्य आता संथ असेल, असे त्या वेळी त्यांना वाटले होते. मसूल खात्यात नोकरी करणाऱ्या वडिलांची बदली राजापूरला झाल्याने तेथील बालपणीचे अनुभव लेखकाने सविस्तरपणे मांडले आहेत. घरातील वातावरण, वाचनाचे आणि अन्य संस्कार कसे झाले याचीही वाचकाला जाणीव होते. लेखांद्वारे त्यांनी आपल्या गावची ओळख सविस्तरपणे करून दिली आहे. त्यामधून तेथील आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचे उत्तम दर्शन होते.

यशोदाआजी, साधेसुधे आजोबा, आई, वडील यांच्या आठवणी विलक्षण हृद्य आहेत. त्यामधून त्यांची स्वभाववैशिष्टय़े कशी आणि का निर्माण झाली, ते समजते. विविध लेखांतून भवतालच्या लक्षणीय व्यक्तिमत्त्वांची शब्दचित्रे लेखकाने उत्तम प्रकारे रेखाटली आहेत. ‘पाग्या इनूस’ हे व्यक्तिचित्र दीर्घकाळ लक्षात राहील असे आहे. कोकणी माणसातील फटकळपणा आणि विनोदी स्वभाव यांचे मिश्रण, त्याच्या व्यक्तिमत्त्वात झाल्याचे दिसून येते. गावातील विविध परिचित कुटुंबांची ओळख नंतरच्या लेखांतून करून दिली आहे. त्या काळातील शेतीवर आधारित परस्परावलंबी जीवनाची ओळख विविध लेखांतून वाचकाला होते. आर्थिक संबंध आणि तरीही प्रेमळ सामाजिक संबंध कसे वृद्धिंगत झाले याचे उत्तम दर्शन त्यामधून होते. कोळंबे गावच्या पणजोळच्या, दामले कुटुंबाच्या आठवणी, जणू त्या काळचे शब्दचित्रच वाचकासमोर रेखाटते आहे. विविध जाती आणि धर्मातील त्या काळातील एकोपा हृद्य आहे आणि अनुकरणीयही! ‘बखर कर्ल्याची’ या पुस्तकातून लेखकाच्या व्यक्तिगत अनुभवांतून, त्या वेळच्या सुखी, समाधानी आणि परस्परावलंबी समाजजीवनाचे उत्तम दर्शन होते.

बखर कर्ल्याची

लेखक: राजीव लिमे

प्रकाशक: सत्वश्री प्रकाशन, रत्नागिरी

पृष्ठे : 107 किंमत: 150.50 मी रु.

Comments are closed.