हिमाचल मधील ढग, मंडी मध्ये भूस्खलन
अनेक वाहने ढिगाऱ्याखाली गाडली गेली : रस्त्यावर भराव आल्यामुळे वाहतूक विस्कळीत
वृत्तसंस्था/ शिमला
हिमाचल प्रदेशातील विलासपूरच्या नामहोलमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा ढगफुटी झाली. या दुर्घटनेत 10 हून अधिक वाहने ढिगाऱ्याखाली गाडली गेली. तसेच रस्तेही वाहून गेले. यात अनेक घरांचेही नुकसान झाले. त्याचवेळी, शनिवारी पहाटे 4 वाजता मंडी जिह्यातील धरमपूर येथील सपदी रोह गावात भूस्खलन झाले. अनेक घरे ढिगाऱ्यांनी वेढली गेली आहेत. या आपत्तीमुळे आठ कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये पाऊस आणि पुरामुळे मृतांचा आकडा 386 वर पोहोचला आहे. या हंगामात राज्यात सामान्यपेक्षा 43 टक्के जास्त पाऊस पडला आहे. अन्य राज्यांमध्येही पावसाचे सत्र सुरू आहे. काही भागात पूर ओसरला असला तरी उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे गंगेची पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हापेक्षा 23 सेंमी वर आहे. येथे 80 गावे पुराच्या विळख्यात आहेत. 100 हून अधिक कुटुंबे बेघर झाली आहेत.
हवामान खात्याने नैर्त्रुत्य मान्सूनची माघार 15 सप्टेंबरच्या सुमारास पश्चिम राजस्थानमधून सुरू होऊ शकते, असे जाहीर केले आहे. साधारणपणे 17 सप्टेंबरच्या सुमारास मान्सून वायव्य भारतातून माघार घेण्यास सुरुवात करून 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे माघार घेतो. यावर्षी मान्सून 24 मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. तसेच 29 जूनपर्यंत देशभर व्यापला होता. सर्वसाधारणपणे 8 जुलैपर्यंत तो संपूर्ण देश व्यापतो. मात्र, यंदा 9 दिवस अगोदरच संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला होता.
Comments are closed.