रोखठोक – हिमालय का पेटला?

हिमालयाच्या कुशीतल्या नेपाळात वणवा भडकला. संपूर्ण सरकार त्यात जळून राख झाले. एकाधिकारशाही, मनमानी, भ्रष्टाचार, बेरोजगारी यातून नेपाळच्या तरुणाईत असंतोषाची आग भडकली व त्या तरुणांनी स्वत:च्या देशालाच आग लावली! यामागे नक्की कोण असावे?

भारताचे शेजारी राष्ट्र नेपाळमध्ये सध्या जे अराजक, हिंसाचार माजला आहे, त्यावर भारतातील सर्वच क्षेत्रांत मंथन सुरू झाले आहे.

भारत हा महात्मा गांधींचा देश आहे, पण मोदी-शहांना गांधी विचार मान्य नाहीत. भारतात आजही गांधींचा अहिंसा, सत्य, शांतीचा विचार कायम असल्याने आपले राज्यकर्ते सुखरूप आहेत. ज्या दिवशी गांधी विचार संपूर्ण मारला जाईल, त्या दिवशी भारतात `नेपाळ’प्रमाणे आग लागल्याशिवाय राहणार नाही.

नेपाळात पुन्हा एकदा राज्यक्रांती झाली व त्यात सर्वकाही जळून राख झाले. हे अराजक आहे. अराजक भारताच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. नेपाळमध्ये अराजक माजले म्हणून भारताच्या सीमांवरील चौकी-पहारे वाढवले. त्याने काय होणार?

  • नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनी राजीनामा देऊन पलायन केले आहे.
  • नेपाळच्या राष्ट्रपतींनाही जनक्षोभापुढे नमते घेऊन राजीनामा द्यावा लागला.
  • नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी राजीनामा देऊन पलायन केले आहे.
  • नेपाळच्या मंत्र्यांची, माजी पंतप्रधानांची घरे जाळण्यात आली.
  • नेपाळच्या संसदेला लोकांनी आग लावली.
  • नेपाळचे अर्थमंत्री, ऊर्जामंत्री, परराष्ट्र मंत्र्यांना लोकांनी रस्त्यावर आणून मारले आहे.
  • भारतात आपण ज्यांना `गोदी मीडिया’ म्हणतो, नेपाळमधील गोदी मीडियाच्या कार्यालयांना, प्रेसला आगी लावण्यात आल्या.
  • नेपाळमध्ये सैन्य रस्त्यावर उतरले, पण लोकक्षोभापुढे सैन्याला शरणागती पत्करावी लागली.

हिमालयाच्या कुशीतले नेपाळ हे एकेकाळचे हिंदू राष्ट्र. आज ते जळत आहे. जणू हिमालयाला आग लागली व त्या आगीच्या धुरांनी भारत देश गुदमरला आहे.

नेपाळची युवा पिढी भ्रष्टाचार, बेरोजगारी, राज्यकर्त्यांची थापेबाजी यामुळे त्रस्त झाली व त्यातून हे सर्व घडले हे मान्य केले तरी जे घडले ते योग्य नाही. जुलमी राज्यव्यवस्थेचा अंत असाच होतो व हा अंत होत असताना धर्म, देव कोणीच मदतीला येत नाही!

का घडले?

नेपाळमध्ये ही स्थिती का निर्माण झाली? पंतप्रधान केपी ओली यांच्या सरकारने समाज माध्यमांचे अनेक `अ‍ॅप्स’ बंद केल्याने तरुण वर्ग चिडला व त्यांनी हे घडवले या दंतकथेवर विश्वास बसत नाही.

भ्रष्टाचार, बेरोजगारी व सरकारमधील अनागोंदी यामुळे त्रस्त झालेल्या जनतेचा संयम सुटला आणि नेपाळला आग लागली.

पण हा संयम प्रथम सुटला नाही.

नेपाळातून आधी राजेशाही हटवली गेली. चीनपुरस्कृत कम्युनिस्टांचे राज्य लोकशाही मार्गाने आले. त्यांनी नेपाळ `हिंदू राष्ट्र’ म्हणून रद्द केले. संविधान बदलले. कम्युनिस्टांचे नेते श्री. प्रचंड हे पंतप्रधान झाले, पण शेवटी त्यांनाही जावे लागले. ज्यांनी हिंदू राष्ट्राचा झेंडा उतरवला त्यांनीच काल काठमांडूतील कम्युनिस्ट पक्षाच्या मुख्यालयावरील `कोयता-विळा’ असलेले लाल झेंडेही उतरवले. सर्वच राज्यकर्त्यांवरील विश्वास उडाल्याचे हे सत्य आहे. जे काल नेपाळात झाले तेच याआधी श्रीलंका आणि बांगलादेशात झाले. म्यानमार आणि पाकिस्तानातही याच पद्धतीने सरकारे उलथवून फेकली गेली.

पंतप्रधान केपी ओली यांच्यासह संपूर्ण सरकार भ्रष्टाचारात बरबटले. पंतप्रधान व मंत्र्यांनी नेपाळातल्या दलालीतून मिळालेल्या पैशांतून `दुबई’त संपत्ती केली. लाडक्या उद्योगपती व नातेवाईकांना मोठी कंत्राटे देण्यात आली. लुटीचा पैसा मीडियाला मिळू लागला. त्यामुळे तेही गप्प राहिले. नेपाळात बेरोजगारीने कळस गाठला. सरकार अहंकाराने बेफाम झाले. त्यामुळे लोकांत खदखद वाढतच राहिली. या खदखदीला आग लावण्याचे काम अज्ञात शक्ती करीत राहिल्या. भारताच्या सीमेवरील राष्ट्रांत असंतोष भडकून त्याची आग भारतापर्यंत पोहोचावी असे कारस्थान असावे या शंकेस जागा आहे. लोकांनी पंतप्रधान, मंत्र्यांची घरे जाळली. भारतात `व्होट चोर, गद्दी छोड’ हा नारा गुंजतो आहे. नेपाळात तो पोहोचला पंतप्रधानांच्या नावाने, `केपी चोर, गद्दी छोड’ हे नारे नेपाळच्या सडकेवर गुंजताना दिसले. भारतात `व्होट चोरी’तून आलेल्या सरकारविरुद्ध आग लागली आहे, पण भडका मात्र नेपाळात उडाला.

दिशाहीन हालचाल

नेपाळात जे क्रांतिकारी म्हणून रस्त्यावर उतरले, ते आता दिशाहीन झाले आहेत. त्यापैकी अनेकांच्या हातात बंदुका दिसत आहेत. नेपाळमधील राजेशाहीविरुद्ध ज्यांनी बंदूक हाती घेतली, ती पिढी आज दिसत नाही. नव्या पिढीने लोकशाहीतून निर्माण झालेल्या सरकारविरुद्ध बंदुका हाती घेतल्या आहेत. एकेकाळचे हे हिंदू राष्ट्र. आजही येथील बहुसंख्य जनता हिंदू धर्माचे पालन करते. हिंदूंची मंदिरे येथे आहेत. भारताचे पंतप्रधान मोदी पशुपतीनाथ मंदिरात जातात, पण नेपाळ भारताच्या कह्यात राहिला नाही. भूतान, नेपाळ हे देश भारताला सदैव मोठा भाऊ मानत राहिले, पण चीनच्या भीतीने मोदी सरकार भूतान, नेपाळला संकटकाळी वाऱ्यावर टाकून पळाले. त्याचा फायदा चीनने घेतला. नेपाळमध्ये आज माओवाद कमालीचा पसरला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेपाळात हिंदुत्वाचा प्रसार करायला गेला, पण तेथील हिंदूंचा विश्वास आपण गमावून बसला. भूतान, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश, पाकिस्तान या सीमावर्ती देशांत चीनने सरळ घुसखोरी केली. चीनच्या आर्थिक मदतीवर हे सर्व देश जगत आहेत. त्यांना आता अमेरिकेची गरज वाटत नाही. हिंदुस्थानच्या मोठ्या भूभागावर चीनने घुसखोरी केली. चीनने भारताविरोधात पाकिस्तानला उघड मदत केली. त्या चीनशी मैत्री करावी असा झटका आता भारताच्या पंतप्रधानांना आला आहे. शेजारी राष्ट्रांनी भारताची दखल घेण्याचे थांबवले आहे. शेजारच्या राष्ट्रसमूहात भारताला कोणीच मित्र उरलेला नाही. नेपाळमध्ये अचानक उसळलेल्या आगडोंबामागे नक्की कोण आहे? हा प्रश्न तरीही राहतोच.

आशिया उपखंडातील राष्ट्रांत चीनचे वर्चस्व कमी करण्यासाठी अमेरिका या बंडाळ्या घडवत आहे काय?

नेपाळचे पंतप्रधान शांघाय परिषदेत चीनला जाऊन आले व त्यांच्या देशात बंडाळी झाली.

भारताचे पंतप्रधान मोदीही चीनशी हातमिळवणी करत आहेत.

चिंता वाटावी असा हा प्रकार आहे.

ट्विटर – @Rautsanjay61

जीमेल- [email protected]

Comments are closed.