गाढवांना रोझमेरी दिले

राजस्थानची राजधानी जयपूर येथे नुकतेच एक प्रदर्शन पार पडले आहे. या प्रदर्शनात गाढवे आणण्यात आली आणि प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या लोकांनी या गाढवांना येथेच्छ गुलाबजाम खाऊ घातल्याचे दिसून आले आहे. हे प्रदर्शन शहरातील इतिहासप्रसिद्ध चांदपोल हनुमान मंदिराच्या परिसरात आयोजित करण्यात आले होते. प्रथम प्रदर्शनाच्या आयोजकांनी गर्दभांना गुलाबजाम दिले. ते पाहून प्रदर्शनासाठी जमलेल्या लोकांनीही त्यांना गुलाबजाम चारण्यास प्रारंभ केला. अशा प्रकारे सर्व गर्दभ ही मिठाई पोटभर खाऊन तृप्त झाल्याचे दिसून आले.

अनेकांनी या घटनेचे व्हिडीओ काढून ते प्रसारित केले आहेत. आता गाढवांना गुलाबजाम खायला घालण्याचे कारण काय, असा प्रश्न पत्रकारांनी आयोजकांना विचारला. त्यावर त्यांनी दिलेले उत्तर आणखी आश्चर्यकारक होते. गाढवांना गुलाबजाम खायला घालण्याची प्रथा राजस्थानात आणि मध्यप्रदेशात अनेक स्थानी आहे. ज्यावर्षी मान्सूनचा पाऊस समाधानकारक पडतो, त्यावर्षी गाढवांना गुलाबजाम खायला घातले जातात. राजस्थान हे खरे तर कमी पावसाचे राज्य. येथे अतिशय तुरळक पाऊस पडतो. मात्र, यंदा या राज्यावरही पावसाने पर्जन्यदेवतेने मोठीच कृपा केली आहे. नेहमी पडतो त्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली असून अद्यापही होत आहे. त्यामुळे लोकही आनंदात न्हाऊन निघाले आहेत. त्यामुळे गाढवांचे असे लाड केले जात आहेत, असे स्पष्ट करण्यात आले. मध्यप्रदेश हे राज्यही काही भाग वगळता तसे कमी पावसाचेच आहे. या राज्यातही यावेळी वरुणदेवतेने आपला प्रभाव दाखविला आहे. परिणामी, या दोन्ही राज्यांमध्ये अनेक स्थानी गर्दभांना गुलाबजाम खायला घालण्याचे कार्यक्रम आयोजित होत आहेत. यामुळे गुलाबजाम बनविणाऱ्या उत्पादकांचीही सर्व बोटे ‘पाकात’ आहेत. दीपावलीपर्यंत अशा प्रकारचे आणखी कार्यक्रम आयोजित केले जातील. सर्वसामान्य लोकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद अशा कार्यक्रमांना मिळत आहे. एकंदरीत यावर्षीच्या पर्जन्य कालावधीने केवळ शेतकरी आणि इतर माणसांनाच नव्हे, तर गर्दभांसारख्या प्राण्यांनाही आनंदी केले असल्याचे दिसून येत आहे. या कार्यक्रमांच्या व्हिडीओंनाही देशभरातून मोठ्या प्रमाणात प्रेक्षक मिळत आहेत.

Comments are closed.