मिझोरममध्ये प्रथमच ट्रेन धावते
पंतप्रधान मोदींनी तीन गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा
वृत्तसंस्था/ मॉस्को
स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतर आणि भारतीय रेल्वे सुरू झाल्याच्या 172 वर्षांनंतर शनिवारी मिझोराम रेल्वेशी जोडले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरामच्या बहुप्रतिक्षित बैराबी-सैरांग रेल्वेमार्गाचे उद्घाटन केल्यानंतर मिझोरामच्या जनतेने पहिल्यांदाच ट्रेनची शिट्टी ऐकली. मिझोराम आता रेल्वेच्या माध्यमातून इतरांशी जोडले गेल्यामुळे येथील शेतकरी आणि व्यवसाय देशभरातील अधिक बाजारपेठांपर्यंत पोहोचू शकतील. लोकांना शिक्षण आणि आरोग्यसेवेसाठीही चांगल्या संधी मिळतील. या विकासामुळे अनेक क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोराममध्ये 9,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. पंतप्रधानांनी शनिवारी मिझोरामच्या पहिल्या रेल्वेमार्गाचेही उद्घाटन केले. पंतप्रधानांनी 8,070 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या बैराबी-सैरांग नवीन रेल्वेमार्गाचे उद्घाटन केल्यानंतर मिझोरामची राजधानी पहिल्यांदाच भारतीय रेल्वे नेटवर्कशी जोडली गेली. त्यांनी ऐझॉल ते दिल्लीला जोडणाऱ्या राज्यातील पहिल्या राजधानी एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. या रेल्वे प्रकल्पाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मिझोरामचे सैरंग राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीशी थेट जोडले जाईल. ही केवळ रेल्वे नाही तर परिवर्तनाची जीवनरेखा असल्यामुळे मिझोरामच्या लोकांच्या जीवनात आणि उपजीविकेत क्रांती घडेल, असे मोदी म्हणाले.
काही वर्षांपूर्वी मला ऐझॉल रेल्वेमार्गाची पायाभरणी करण्याचा मान मिळाला होता. आज आम्हाला ती देशवासियांना समर्पित करण्याचा अभिमान आहे. दुर्गम मार्गांसह अनेक आव्हानांवर मात करून बैराबी-सैरांग रेल्वेमार्ग आता प्रत्यक्षात आला आहे. आमच्या अभियंत्यांच्या कौशल्याने आणि आमच्या कामगारांच्या उत्कटतेने हे शक्य झाले आहे, असे मोदी म्हणाले. ‘ही केवळ रेल्वे जोडणी नाही तर ती बदलाची जीवनरेखा आहे. यामुळे मिझोरामच्या लोकांच्या जीवनात आणि उपजीविकेत क्रांती होईल. मिझोरामचे शेतकरी आणि व्यवसाय देशभरातील अधिक बाजारपेठांपर्यंत पोहोचू शकतील.’ असा आशावादही पंतप्रधानांनी व्यक्त केला.
Comments are closed.