कराळे मास्तर वेटिंगवर! शरद पवारांची भेट घेण्यासाठी हॉटेलच्या गेटवर 20 मिनिटं ताटकळले; नेमकं काय

नितेश कराले मास्टर: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP Sharad Pawar Faction) वतीने नाशिकमध्ये रविवारी (दि. 14 सप्टेंबर) एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आडगाव परिसरातील स्वामी नारायण बँकवेट हॉल येथे हे शिबीर होणार आहे. या शिबिरासाठी शरद पवार गटाचे राज्यभरातील अनेक बडे नेते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे स्टार प्रचारक म्हणून ओळखले जाणारे नितेश कराळे  (Nitesh Karale) मास्तर देखील शिबिराला हजेरी लावणार आहेत. कराळे मास्तर शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेण्यासाठी ते थांबलेल्या हॉटेलवर आले होते. मात्र यावेळी घडलेल्या एका प्रसंगाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

नेमकं काय घडलं?

शरद पवार ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या ठिकाणी कराळे मास्तर पोहोचले. पण सुरक्षा यंत्रणेकडून त्यांना हॉटेलच्या गेटवरच थांबवण्यात आलं. जवळपास 15 ते 20 मिनिटं ते गेटवरच ताटकळत उभे राहिल्याचे पाहायला मिळाले. या दरम्यान कराळे मास्तरांनी दूरध्वनीद्वारे आयोजकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात आला. सुरक्षेच्या कारणास्तव मोजक्या लोकांनाच शरद पवार असलेल्या हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात येत होता, त्यामुळेच ही अडचण निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. पण, नितेश कराळे मास्तर हे शरद पवार यांच्या अनेक राजकीय सभांमध्ये दमदार भाषणांनी चर्चेत राहिले आहेत. त्यांच्या शैलीदार आणि आक्रमक भाषणांनी अनेक सभा गाजल्या आहेत. त्यामुळेच अशा स्टार प्रचारकाला गेटवर थांबवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

“देवा भाऊ” कॅम्पेनला शरद पवार गटाचं प्रत्युत्तर

दरम्यान, भाजपने राबवलेल्या “देवा भाऊ” कॅम्पेनला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नाशिक जिल्ह्यातील विविध दैनिकांमध्ये जाहिरात देत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केला आहे. “शेतकरी कर्जमाफी, आत्महत्या, पीक विमा, कांदा निर्यातबंदी, अतिवृष्टीचं नुकसान, २१०० रुपये बहिणींना आणि युवांना रोजगार या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार?” असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय.  या पार्श्वभूमीवर, पक्षाच्यावतीने सोमवारी नाशिकमध्ये भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

काय वाट्टेल ती किंमत देऊ पण महाराष्ट्र एकसंघ राहण्यासाठी प्रयत्न करू; नाशिकमधून शरद पवारांचे वक्तव्य

आणखी वाचा

Comments are closed.