167 कोटी रुपये खर्च करून बांधणार डबल डेकर एल्फिन्स्टनचा पूल, 2027 पर्यंत सुरु होण्याची शक्यता

112 वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल आता अधिकृतपणे एमएमआरडीएने बंद केला असून त्याची जबाबदारी एमआरआयडीसीकडे सोपवण्यात आली आहे. हा पूल नव्या स्वरूपात उभारला जाणार असून आधी तो पाडण्यात येईल आणि नंतर नव्या डिझाइननुसार पुन्हा बांधण्यात येईल. नवीन पूल हा डबल डेकर असून त्यासाठी 167 कोटी रुपये खर्च होणार आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने या पुलाच्या बांधकामाचा तपशील एमआरआयडीसीला दिला आहे. विशेष म्हणजे हा पूल डबल डेकर असणार आहे, ज्यामुळे वाहतुकी कोंडी कमी होईल.
2027 पर्यंत हा पूल तयार होऊन वाहतुकीसाठी खुला होईल या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 167.34 कोटी रुपये इतका असेल. या प्रकल्पातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे जुना पूल हटवणे होय. यासाठी दोन 800 मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेनचा वापर करण्यात येईल. विशेष म्हणजे हे काम पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या गाड्यांची वाहतूक सुरू असतानाच करण्यात येणार असून त्यासाठी बारकाईने नियोजन आणि सुरक्षा व्यवस्था केली जाणार आहे.
पुलाच्या खालच्या थरात (लोअर डेक) 2+2 लेन आणि पादचारी मार्ग असेल, ज्यामुळे पूर्व आणि पश्चिम यांच्यातील संपर्क सुलभ होईल. हा पूल थेट शिवडी-वरळी एलिव्हेटेड कॉरिडॉरशी जोडला जाईल आणि अटल सेतूपर्यंत (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) जोडणी देईल. या पुलाचे सुपर स्ट्रक्चर ‘ओपन वेब गर्डर’ तंत्रज्ञानावर आधारित असेल, जे रेल्वे पूल बांधकामामध्ये अत्यंत टिकाऊ आणि मजबूत मानले जाते.
Comments are closed.