Ind vs Pak: हार्दिक पांड्याचा कहर! पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानला केले गारद

आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रोमांचक सामना दुबईच्या मैदानावर खेळला जात आहे. शेजारील देशाचा कर्णधार सलमान आगा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सामन्याला जबरदस्त सुरुवात करून दिली. हार्दिक पांड्याने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानचा युवा स्टार फलंदाज सॅम अय्यूब याला खातेही न उघडता पॅव्हेलियन मध्ये पाठवले. अय्यूब आपला शॉट खाली ठेवू शकला नाही आणि चेंडू थेट जसप्रीत बुमराहच्या हातात मारला. हार्दिकने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेऊन मोठे यश आपल्या नावावरती केले.

हार्दिक पांड्या टीम इंडियाकडून टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. त्याने सॅम अय्यूबला पॅव्हेलियनमध्ये पाठवत ही मोठी कामगिरी आपल्या नावे केली. हार्दिकपूर्वी हा पराक्रम अर्शदीप सिंगने केला होता.

अर्शदीपने वर्ष 2024 मध्ये अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली होती. हार्दिकनंतर दुसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहनेही आपली कमाल दाखवली आणि मोहम्मद हारिसला केवळ 3 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. बुमराहच्या चेंडूवर हारिसने फटका मारताना तो हवेतच उंचावला आणि सीमारेषेजवळ हार्दिकने झेल घेण्यात चूक केली नाही.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघाने आपल्या प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. टीम इंडिया तीन फिरकीपटूंनी सज्ज होऊन मैदानात उतरली आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात आलेले नाही. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने यूएईला 9 विकेट्सनी पराभूत करत धूळ चारली होती.

कुलदीप यादव आणि शिवम दुबे यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने यूएईला अवघ्या 57 धावांत गारद केले होते. 58 धावांचे लक्ष्य टीम इंडियाने निवांतपणे केवळ 27 चेंडूत पूर्ण केले होते. अभिषेक शर्माने आक्रमक फलंदाजी करत फक्त 16 चेंडूत 30 धावा ठोकल्या, तर शुबमन गिलने 9 चेंडूत 20 धावा करत नाबाद खेळी केली होती.

Comments are closed.