‘दशावतार’ने तीन दिवसांत कमावले पाच कोटी, दिलीप प्रभावळकरांची बॉक्स ऑफिसवर जादू

मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळत नसल्याची ओरड असताना ‘दशावतार’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांतच या चित्रपटाने तब्बल 5 कोटी 22 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. ‘दशावतार’ची जादू अनुभवण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी उसळली असून सर्वत्र हाऊसफुल्ल बोर्ड झळकत आहेत. 81 वर्षीय अष्टपैलू अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेला बाबूली मेस्त्री प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाला आहे.

‘दशावतार’च्या माध्यमातून प्रेक्षकांना कोकणातील समृद्ध संस्कृती, परंपरा आणि लोककलेचा अप्रतिम संगम पाहायला मिळत आहे. यासोबतच गाणी आणि दिग्दर्शनातील भव्यता ही चित्रपटाची खरी ताकद ठरली आहे. सुरुवातीला तब्बल 325 स्क्रिन्समधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘दशावतार’चे 600 शोज् होते, शनिवारी हा आकडा 800 एवढा झाला, तर रविवारी यामध्ये वाढ होऊन तो 975 शोज् असा झाला. या चित्रपटात सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, अभिनय बेर्डे, आरती वडगबाळकर यांच्याही भूमिका आहेत.

‘दशावतार’ला मिळणारा हा प्रतिसाद म्हणजे आमच्यासाठी स्वप्न साकार झाल्यासारखे आहे. ‘दशावतार’मधून कोकणातील कला आणि संस्कृतीसोबतच पर्यावरणाच्या रक्षणाबद्दल केलेल्या भाष्याला प्रेक्षकांनी उचलून धरले आहे. प्रामाणिकपणे सांगितलेल्या गोष्टीला प्रेक्षक खुल्या मनाने स्वीकारतात हे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालेय. प्रत्येकाने घेतलेली मेहनत सार्थकी लागल्याचे समाधान आहे, असे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सांगितले.

Comments are closed.