पुन्हा मोनोरेल मध्येच लटकली, एमएमआरडीएचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ; 17 प्रवासी पाऊण तास गाडीत अडकले

महायुती सरकारचा विकासाचा दिखावा सुरक्षेच्या टप्प्यावर सपशेल फेल ठरला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यातील एमएमआरडीएने मोनोरेलच्या सुरक्षेकडे अद्याप गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे सोमवारी सकाळी आणखी एक मोनोरेल ट्रेन मधेच लटकली. ट्रेनमध्ये 17 प्रवासी पाऊण तास अडकले होते. मोठी कसरत करून त्यांना दुसऱया मोनोरेलमध्ये हलवण्यात आले. मुसळधार पावसात प्रवाशांनी हा जीवघेणा थरार अनुभव घेतला. महिनाभरात दुसऱयांदा मोनोरेल अर्ध्या प्रवासात लटकल्याची घटना घडली.

सोमवारी सकाळी 7 वाजता अँटॉप हिल बस डेपो आणि वडाळा जीटीबीएन मोनोरेल स्थानकादरम्यान ही घटना घडली. मोनोरेल ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला आणि गाडी मधेच अडकून पडली. बिघाडाची माहिती मिळाल्यानंतर नियंत्रण कक्षाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले. मुंबई अग्निशमन दलालादेखील संपर्क साधण्यात आला होता. मात्र अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचण्याआधी तांत्रिक कर्मचाऱयांनी प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. जवळपास पाऊण तासांनंतर 17 प्रवाशांना बिघडलेल्या मोनोरेलमधून बाहेर काढण्यात आले. अचानक झालेल्या बिघाडाने प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. अडकलेल्या प्रवाशांना मोठी कसरत करून गाडगे महाराज स्थानकाकडे चाललेल्या दुसऱया ट्रेनमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. बिघडलेली ट्रेन दक्षिण मुंबईतील गाडगे महाराज स्थानकातून चेंबूरकडे चालली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी वा कुणालाही दुखापत झाली नाही, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अडीच तासांनंतर सेवा पूर्वपदावर

तांत्रिक बिघाडामुळे ट्रेन मधेच बंद पडल्याने मोनोरेलची चेंबूरकडील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. काही नियमित फेऱया रद्द झाल्या. त्यामुळे प्रवाशांची मोनोरेलच्या सर्व स्थानकांत रखडपट्टी झाली. हा गोंधळ तब्बल अडीच तास कायम होता. रखडलेले शेकडो प्रवासी मोनोरेलच्या स्थानकांतून माघारी फिरले. त्यांनी बेस्ट बस, टॅक्सी तसेच लोकल ट्रेनमधून इच्छित ठिकाण गाठले. यादरम्यान बिघाड झालेली ट्रेन खेचून वडाळाच्या दिशेने नेण्यात आली. अडीच तासांनंतर मोनोरेलची सेवा पूर्वपदावर आली.

ऑगस्टमध्ये 580 प्रवासी ‘मोनो’मध्ये अडकले होते!

गेल्या महिन्यात मुसळधार पावसात म्हैसूर कॉलनी आणि भक्ती पार्क स्थानकांदरम्यान प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीमुळे गाडी एका बाजूने झुकली होती. त्या गाडीमध्ये 580 हून अधिक प्रवासी अडकले होते. रात्रीच्या सुमारास प्रवाशांनी भयावह अनुभव घेतला होता. अखेर गाडीच्या काचा फोडून प्रवाशांना क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढले होते. महिनाभरात घडलेल्या दुसऱया घटनेने मोनोरेलच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Comments are closed.