राज्यात ई-बाईक टॅक्सीचे बेसिक भाडे 15 रुपये, लवकरच सुरू होणार सेवा
सोमवारी परिवहन प्राधिकरणाने ई-बाईक टॅक्सीचे भाडे जाहीर केले आहे. पुढच्या महिन्याभरात ही सेवा सुरू होणार आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने हे भाडे निश्चित केले असून, राज्य परिवहन विभागाने मंजूर केले आहे. हे भाडं महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम, 2025 अंतर्गत लागू असणार आहे.
बाईक टॅक्सींसाठी कमीत कमी भाडे दीड किमी साठी 15 रुपये असेल आणि प्रत्येक अतिरिक्त किलोमीटरसाठी 10.27 रुपये आकारले जाईल. तुलनेत, ऑटो रिक्षांचे बेसिक भाडे 26 रुपये असून, पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 17.14 रुपये असणार आहे. काळी-पिवळी टॅक्सींचे कमीत कमी भाडे 31 असून, प्रत्येक अतिरिक्त किलोमीटरसाठी 20.66 रुपये आकारले जाणार आहे.
अॅप-आधारित बाईक-टॅक्सी अॅग्रिगेटर्सना कायम परवान्यापूर्वी तात्पुरता परवाना दिला जाईल अशी माहिती परिवहन विभागाने दिली. ही सेवा तातडीने सुरू करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एका महिन्याच्या कालावधीत, रॅपिडो, उबर आणि ओला यांसारख्या राइड-हेलिंग कंपन्यांनी कायमस्वरूपी परवाना मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.
एप्रिल महिन्यात राज्य सरकारने 1 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी बाईक-टॅक्सी धोरण जाहीर केले होते. या नव्या धोरणामध्ये भाडे ठरवणे यासह सेवेच्या विविध बाबींचे नियमन केले जाईल. आतापर्यंत बाईक-टॅक्सीचे भाडे कोणत्याही नियंत्रणाखाली नव्हते आणि राइड-हेलिंग कंपन्या मनमानी दर आकारत होत्या.
भाडे निश्चित करण्यासाठी सखोल चर्चा झाली होती, असे राज्य परिवहन विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. 18 ऑगस्ट रोजी परिवहन सचिव संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत हे दर ठरवण्यात आले. मात्र, सोमवारी या बैठकीच्या मिनिट्सवर स्वाक्षरी झाल्यामुळे औपचारिक घोषणा होण्यासाठी जवळपास एक महिना लागला, असे त्यांनी सांगितले.
हे भाडे खटुआ समितीने तयार केलेल्या सूत्रानुसार निश्चित करण्यात आले आहे. याच सूत्राचा वापर ऑटो रिक्षा आणि टॅक्सींचे भाडे दुरुस्ती व अद्ययावत करण्यासाठी केला जातो, असे त्यांनी स्पष्ट केले. याआधी मुंबईसह इतर ठिकाणी बाईक-टॅक्सी बेकायदेशीरपणे सुरू होत्या. गेल्या काही महिन्यांत मुंबई महानगर प्रदेशात राज्या परिवहन विभागाने 123 बाईक-टॅक्सींच्या विरोधात कारवाई केली आहे.
Comments are closed.