राज्याच्या लुटीला फडणवीस, अजित पवार आणि डाकू मानसिंगच जबाबदार आहेत; संजय राऊत यांचा घणाघात

राज्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. राज्यावरील कर्जाचा आकडा आता 10 लाख कोटींच्यावर गेला आहे. राज्याची विविध योजनांच्या माध्यमातून लूट सुरू असल्यानेच राज्याचे कर्ज वाढल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच राज्याच्या या परिस्थितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवार आणि डाकू मानसिंगच जबाबदार आहे, असा घणाघातही त्यांनी केला.

गेल्या तीन महिन्यातच जे राज्य 24000 कोटींचे कर्ज घेते, त्या राज्याची अवस्था नेपाळसारखीच झालेली आहे, असे म्हटल्यास अयोग्य ठरणार नाही. बेरोजगारी वाढत आहे, विकासकामे ठप्प आहेत, फक्त मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांकडून एसआरएची कामे सुरू आहेत. ती कामे त्यांना मिळत आहेत. त्यांना पैसे मिळत आहेत. नागरी वस्त्यांमध्ये कबुतरांना दाणे टाकण्याचे काम सुरू आहे. या शिवाय राज्यात कोणतेही काम सुरू नाही. जात विरुद्ध जात भांडणे लावत जनतेचे लक्ष विचलीत करण्यात येत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येक जात रस्त्यावर आणली जात आहे. शिक्षणापासून रोजगारापर्यंत या सरकारच्या काळात काय प्रगती केली, याबाबत मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे पत्रकारांशी संवाद साधण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

राज्यात सर्वत्र लूट सुरू आहे. त्या लुटीमुळे महाराष्ट्रावर 10 लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर झाला आहे. राज्याची एवढी आर्थिक दुरवस्था कधीही झाली नव्हती. राज्याला आर्थिक शिस्त लावणारे अजित पवार यावर काही भाष्य करणार आहेत का? त्यांना आर्थिक शिस्तीची खूप काळजी असते. मात्र, स्वतःच्या लोकांना महाराष्ट्र लुटू द्यायचा, हे त्यांचे धोरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवार आणि अमित शहा यांच्या कृपेने आलेले डाकू मानसिंग ते चंबळ खोऱ्यातून महाराष्ट्र लुटायलाच आले आहेत. अशा प्रकारे राज्याची लूट सुरू असेल तर काय होणार या महाराष्ट्राचे, पुढील पिढीचे कसे होणार? असा प्रश्न उभा राहत आहे, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

सुमारे 9 लाख कोटींचे कर्ज कोणी केले, कोणामुळे झाले, कोणत्या योजनांमुळे झाले हे जनतेला समजायला हवे. चारही बाजूंनी महाराष्ट्र ओरबाडला जात आहे. जो पैसा राज्यात तिजोरीत यायला हवा, तो पैसा कोणाच्यातरी खिशात जात आहे. तीन-ती हजार कोटींची टेंडर करून पैसा लुटला जात आहे. समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महाराष्ट्र अशी अनेक उदाहरणे देता येतील. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून 2 लाखे कोटींची कामे देण्यात आली, त्याचा काही अतापताच नाही. ती कामे फक्त कागदावर आहेत. ठेकेदाराकडून 25 टक्के कमीशन त्यांना मिळाले आहे. अशा प्रकारे राज्यात लूट सुरू आहे, असे ते म्हणाले.

मुंबईच्या एसआरएमध्ये महेंद्र कल्याणकर या अधिकाऱ्याबाबत रोज एवढी माहिती येत आहे. त्याबाबत मुख्यमंत्री काय करत आहे. गरीबांच्या हक्कांवर गदा आणत एसआरए राबवण्यात येत आहे. हा पैसा कोणत्या राजकीय पक्षाकडे, कोणत्या नेत्याकडे, कोणत्या गटाकडे जात आहे, याबाबत महाराष्ट्राची चिंता वाढत आहे. आम्ही नेपाळचे उदाहरण दिले की त्यांना मिरच्या झोंबतात. आम्हाला माओवादी ठरवण्यात येते. पण नेपाळ अशाप्रकारेच राज्यकर्त्यांनी लुटला. त्यातूनच जनतेचा उद्रेक झाला, तो धक्कादायक आहे. त्याचे समर्थन करता येणार नाही. मात्र, आता जनतेच्या संयमाचा बांध फुटतोय, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. राज्यावर 10 लाख कोटींचे कर्ज झाले आहे. असे असूनही राज्याला प्रगतीपथावरील राज्य म्हणत आहेत. अनेक योजना फक्त राजकीय फायद्यासाठी आणल्या, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीकडे लक्ष देण्यात येत नाही. आणखी काही कर्ज घ्या, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच प्रमाण वाढत आहे. शेतकऱ्यांच्या काद्यांला भाव नाही, शेतमालाला हमीभाव नाही, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. मग 10 लाख कोटींचे कर्ज कसे झाले, कोणसाठी कर्ज घेतले, फक्त लाडक्या बहीण योजनेसाठी कर्ज झाले असेल तर त्यांनी ते त्यांच्या खिशातून द्यावे. कारण यातही हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. लाखो बेकादेशीर आणि बोगस आहेत. ते भाजपचे कार्यकर्ते आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

सर्वात जास्त भ्रष्टाचार मंगलप्रभात लोढा यांच्या कौशल्यविकास खात्यात होत आहे. हजारो, लाखो बोगस खाते आहेत. त्यांना या योजनेतून दर महिन्याला पैसे दिले जात आहेतस ते सर्व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. या विभागातून सर्वात जास्त ओरबाडणे विदर्भ आणि नागपूर विभागात आहेत. त्यांना भ्रष्ट मार्गाने या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. लाडकी बहीण योजना, कौशल्य विकास योजना आणि एसआरए योजना यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. त्यामुळे राज्यावर 10 लाख कोटींचे कर्ज झाले आहे. त्याला मुख्यमंत्री फडणवीस, अर्थमंत्री अजित पवार आणि डाकू मानसिंग जबाबदार आहे, असा घणाघातही त्यांनी केला.

Comments are closed.