Pandharpur News – नवरात्र उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे पुरातन अलंकार गाठविण्याचे काम सुरू

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे अलंकार अत्युत्कृष्ट व असामान्य कलाकुसरीचे तसेच पुरातन व दुर्मिळ आहेत, असे अलंकार उत्सवाप्रसंगी श्रींस परिधान करण्यात येतात. नवरात्र उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे पुरातन अलंकार गाठविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

शिवकालीन, पेशवेकालीन अनेक अमूल्य दागिणे श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेस असून, यामध्ये श्री विठ्ठलास सोन्याचे पैंजण, बाजीराव कंठी, मत्स्य, तोडे, सोवळे (धोतर), हिऱ्यांचा कंबरपट्टा, बाजुबंद, दंडपेट्या, मणिबंध, सोन्याची राखी, तुळशीची सोन्याच्या मण्यांत गुंफलेली माळ, कौस्तुभमणी, हिरे, पाचूंनी गुंफलेली मोत्यांची कंठी, बोरमाळ, मोत्यांच्या माळा, पुतळ्यांच्या माळा, मोहरांच्या माळा, नवरत्नांचा हार, सोन्याचे मुकुट, हिऱ्यांचा मुकुट, सोन्याची शिंदेशाही पगडी, चांदीची काठी, सोन्याची मकरकुंडले, नील व हिरे बसवलेला नाम- म्हणजे सोन्याचा गंध, असे अनेक प्रकारचे अनमोल अलंकार आहेत. श्री रुक्मिणी मातेस सोन्याचे वाळे, पैंजण, साडी, कंबरपट्टे, माजपट्टा, रत्नजडित पेट्या, हिरे, माणिक, पाटल्या, मोत्यांच्या व रत्नजडित जडावांच्या बांगड्या, गोठ, तोडे, हातसर आहेत.

गळ्यातील अलंकारांमध्ये कारल्याचे मंगळसूत्र, दशावतारी मंगळसूत्र, कोल्हापुरी साज, पाचूची गरसोळी, लहान सरी, मोठी सरी, पुतळ्याची माळ, मोहरांची माळ, एकदाणी, बोरमाळ, ठुशी, तुळशीचा हार, झेला, पोहे हार, चंद्रहार, चपलाहार, पेटय़ांचा हार, शिंदेशाही हार, तन्मणी, चिंचपेटी, नवरत्नांचा हार, शिंदे हार, जवाच्या माळा आणि हायकोल सुर्य-चंद्र असे दागिने आहेत. हिऱ्यांचे खोड असलेला तन्मणी, तारामंडल असे अनेक प्रकारचे अनमोल अलंकार आहेत. सदरचे अलंकार जतन व सुरक्षततेच्या दृष्टीने प्रतिवर्षी गाठविण्यात येतात. सदरचे काम नवरात्र उत्सवापूर्वी करण्यात येते. त्याप्रमाणे यावर्षी सदरचे अलंकार गाठविण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

‘मकर कुंडले तळपती श्रवणी। कंठी कौस्तुभमणी विराजित।’ असे अलंकाराचे वर्णन अनेक अभंगांतून संतांनी केलेले आहे.

Comments are closed.