बॉक्स ऑफिसवर ‘मालवणी डेज’; महाराष्ट्रासह बंगळुरू, इंदूर, हैदराबादमध्ये ‘दशावतार’ला हाऊसफुल्ल प्रतिसाद

कोकणातील समृद्ध संस्कृती, परंपरा आणि लोककलेचा अप्रतिम संगम असलेला ‘दशावतार’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजतोय. कोकणातील निसर्गवैभव, मालवणी भाषेचा गोडवा त्यासोबतच कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मेस्त्रीच्या आयुष्यातल्या वादळांची गोष्ट मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षकांच्या थिएटरबाहेर रांगा लागत आहेत. प्रेक्षकांच्या याच प्रेमाच्या जोरावर तिकीटबारीवर या चित्रपटाने कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आपल्यासह प्रेक्षकांचाही पैसा वसूल केला आहे. यानिमित्ताने बॉक्स ऑफिसवर मालवणी डेज अवतरले आहेत.
चतुरस्र अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची मुख्य भूमिका असलेल्या सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ या चित्रपटाची सुरुवातीपासूनच प्रेक्षकांमध्ये क्रेझ होती. सुरुवातीला 325 स्क्रिन्समधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘दशावतार’चे 600 शोज् होते, शनिवारी हा आकडा 800 एवढा झाला तर रविवारी यामध्ये वाढ होऊन तो 975 शोज् असा झाला. तीन दिवसांतच या चित्रपटाने तब्बल 5 कोटी 22 लाखांचा गल्ला जमवला. सोमवारी वर्किंग डे असतानाही अनेक शो हाऊसफुल्ल झाले होते. मंगळवारी काही शहरात केवळ 99 रुपयांच्या तिकिटाची विशेष ऑफर ठेवल्यामुळे चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली.
पुन्हा मराठी चित्रपटांचा दबदबा
मराठीतील चोखंदळ प्रेक्षक कायमच चांगल्या कलाकृतीच्या पाठीशी उभा राहतो हे या चित्रपटाने सिद्ध केले. केवळ मुंबई-पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बेळगाव, बंगळुरू, इंदूर, हैदराबाद आणि गोव्यातही हा चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरला आहे.
‘कुर्ला टू वेंगुर्ला’चीही चर्चा
‘दशावतार’पाठोपाठ माती आणि नाती जोडणारा ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ हा चित्रपटदेखील या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या रखडणाऱ्या लग्नाचा संवेदनशील विषय या चित्रपटात रंजकपणे हाताळला आहे. या चित्रपटात मालवणी बोलीचाही तडका आहे. विजय कलमकर दिग्दर्शित या चित्रपटात वीणा जामकर, प्रल्हाद कुडतरकर, वैभव मांगले, सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर, साईंकित कामत यांच्या भूमिका आहेत.
Comments are closed.