आफ्रिदीने राहुल गांधींचे कौतुक केले
भारतीय जनता पक्षावर टीका, त्यामुळे पेटला वाद
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी यांने भारताच्या राजकारणात अनाठायी ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. त्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रशंसा केली असून भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेत राहण्यासाठी हिंदू आणि मुस्लीमांमध्ये सातत्याने वाद पेटवत राहतो, असे वक्तव्य त्याने केल्याने भारतीय जनता पक्षाने त्याला पाकिस्तानातील परिस्थिती आधी पाहण्याचा सल्ला दिला आहे.
भारतातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष नेहमी हिंदू-मुस्लीम विवादावर आपले राजकारण करतो. सत्तेत टिकून राहण्यासाठी त्याने हा वाद सातत्याने पेटवत ठेवला आहे. राहुल गांधी मात्र सकारात्मक विचार करतात. त्यांचा चर्चेवर आणि सामोपचारावर विश्वास आहे, अशी तुलना करुन त्याने नवा वाद ओढवून घेतला आहे. इंटरनेटवरही त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.
लोक ब्रह्मज्ञाना म्हणतात.
भारतीय जनता पक्ष काय करत आहे, यावर टिप्पणी करण्यापेक्षा त्याने पाकिस्तानात हिंदूंची अवस्था काय आहे, याचा विचार करावा. भारतात अल्पसंख्याकांची स्थिती उत्तम आहे. पाकिस्तानात ती दयनीय झाली आहे. पाकिस्तानात हिंदू आणि अन्य अल्पसंख्याकांना सन्मानाने जगणेही अशक्य झाले आहे. भारताला शहाणपणा शिकविण्यापेक्षा आणि भारताच्या अंतर्गत राजकारणात ढवळाढवळ करण्यापेक्षा त्याने पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करावा, अशा शब्दांमध्ये आफ्रिदीवर जोरदार टीका होऊ लागली आहे.
भारतद्रोह्यांचे मित्र कोण हे स्पष्ट…
‘हाफीझ सईद असो किंवा आता शाहिद आफ्रिदी, जे जे म्हणून कोणी भारतद्रोही आहेत, त्यांना राहुल गांधी आपले मित्र वाटतात, ही बाब विचार करण्यासारखी आहे,’ अशी खोचक टिप्पणी भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी केली आहे. ‘आयएनसी किंवा इंडियन नॅशनल काँग्रेस ही खऱ्या अर्थाने ‘इस्लामाबाद नॅशनल काँग्रेस’ आहे, अशीही टीका त्यांनी केली आहे.
काँग्रेस-पाकिस्तान मैत्री जुनीच
काँग्रेस आणि पाकिस्तान यांच्यातील ‘याराना’ हा जुनाच आहे. पाकिस्तान जे नॅरेटिव्ह पसरविण्याचा प्रयत्न करतो, तेच काँग्रेसकडूनही पसरविले जाते. अनुच्छेद 370 चे निष्प्रभीकरण असो, किंवा पुलवामा, पहलगाम किंवा अन्य कोणतीही घटना असो, पाकिस्तान जे बोलतो त्याचीच री काँग्रेसकडून ओढली जाते. पाकिस्तान आणि काँग्रेस यांच्यातील ही एकवाक्यता सूचक आहे. भारतद्रोह्यांचे मित्र कोण आहेत, हे यातून स्पष्ट होते, अशा अर्थाची टिप्पणीही त्यांनी केली.
आफ्रिदी पराकोटीचा हिंदूद्वेष्टा
शाहीद आफ्रिदी हा पराकोटीचा हिंदूद्वेष्टा आहे. तो भारताविरोधात विष ओकण्याची कोणतीही संधी सोडत नाही. काश्मीर पाकिस्तानला मिळेल, अशी हे त्याचे दिवास्वप्न आहे. राहुल गांधी यांना पाकिस्तानशी संवाद हवा आहे, असे आफ्रिदीचे म्हणणे आहे. तो भारताची तुलना इस्रायलशी करतो. त्याची विधाने भडकावू आणि अवमानजनक असतात. अशी भारत विरोधी माणसे राहुल गांधी यांचे मित्र असतात, हा निव्वळ योगायोग नाही, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान कक्षाचे प्रमुख अमित मालवीय यांनी केली आहे.
काँग्रेसची प्रतिक्रिया नाही
शाहीद आफ्रिदीची विधाने आणि त्याने केलेली राहुल गांधी यांची स्तुती या संबंधी काँग्रेसने सूचक मौन पाळले आहे. या संदर्भात पक्षाच्या वतीने कोणतीही प्रतिक्रिया अद्यापपावेतो देण्यात आलेली नाही. आफ्रिदी हा नेहमीच आपल्या भारतविरोधी विधानांमुळे वाद निर्माण करतो, असे वारंवार दिसून आले आहे.
Comments are closed.