प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या एमएमआरडीएवर नामुष्की, मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद

प्रवासी सेवेसाठी जुन्या गाडय़ांचा वापर आणि वारंवारच्या तांत्रिक बिघाडांकडे दुर्लक्ष करून हजारो प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या एमएमआरडीएने अखेर मंगळवारी मोनोरेलची सेवा 20 सप्टेंबरपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. गाडय़ांच्या देखभालीतील अपयश चव्हाटय़ावर आल्यानंतर एमएमआरडीएवर ही नामुष्की ओढवली आहे.

दक्षिण मुंबई आणि चेंबूरचा परिसर जोडणाऱ्या मोनोरेलच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे अवघ्या महिनाभरात तीनदा तांत्रिक बिघाड झाला आणि मोनोरेल मधेच लटकली. तिन्ही घटनांमध्ये शेकडो प्रवाशांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. शर्थीच्या प्रयत्नानंतर त्या प्रवाशांना मृत्यूच्या जबडय़ातून बाहेर काढले होते. तांत्रिक बिघाडाच्या घटना वारंवार घडूनही एमएमआरडीएने त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे प्रवाशांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्याचा धसका घेत अखेर एमएमआरडीएने मोनोरेलची चेंबूर ते जेकब सर्कलपर्यंतची संपूर्ण सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मोनोरेलच्या मार्गिकेवर वेळीच नवीन गाडय़ा प्रवासी सेवेत दाखल केल्या नाहीत. त्यामुळे एमएमआरडीएवर सेवा बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे, अशी प्रतिक्रिया नियमित प्रवाशांनी दिली.

महिनाभरातील बिघाड

n 15 सप्टेंबर 2025 – वडाळ्याजवळ मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड; 17 प्रवाशी पाऊण तास गाडीत अडकले.

n 21 ऑगस्ट 2025 – वीज पुरवठा खंडित झाल्याने सेवा ठप्प.

n 19 ऑगस्ट 2025 – ओव्हरलोडमुळे चेंबूर-भक्ती पार्क दरम्यान सेवा बंद; गाडीच्या काचा फोडून 500हून अधिक प्रवाशांना बाहेर काढले.

Comments are closed.