पंतप्रधान मोदी आज 75 वर्षांचे होते

मध्यप्रदेशात होणार त्यांचा वाढदिवस साजरा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस आज साजरा होत आहे. तो ते मध्यप्रदेशमध्ये साजरा करणार आहेत. या दिनानिमित्त ते या राज्यात अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. या राज्यातील धार जिल्ह्याच्या भैंसोला या गावात ते महिला आणि कुटुंबस्वास्थ्य अभियानाचा शुभारंभ करणार आहेत.. तसेच वस्त्रप्रावरण निर्मिती प्रकल्प ‘मित्र पार्क’चा शीलान्यासही करणार आहेत.

17 सप्टेंबर 1950 हा त्यांचा जन्मदिनांक आहे. देशाचा अधिकार हाती आल्यापासून प्रत्येक वेळी ते आपला वाढदिवस जनतेशी संलग्न राहून साजरा करतात. यावेळीही ते मध्यप्रदेशातील लोकांशी आणि तेथून देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशभरात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या अभियानाचा प्रारंभ होणार असून ते 15 दिवस चालणार आहे. हे अभियान देशभरात चालविले जाणार असून त्यात देशभरातील सरकारी रुग्णलये आणि आरोग्य सेवा केंद्रांच्या माध्यमातून 1 लाख स्वास्थ्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ सर्वसामान्य नागरीकांना होणार आहे.

‘मित्र पार्क’चे उद्घाटन

मध्यप्रदेश राज्याच्या धार जिल्ह्यात ते बुधवारी ‘मित्र पार्क’ या वस्त्रप्रावरण निर्मिती संकुलाचा शीलान्यास करणार आहेत. हे औद्योगिक उद्यान 2 हजार 150 एकर भूमीत विस्तारले आहे. त्यात 21 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून कमीत कमी 3 लाख रोजगार निर्माण होणार आहेत. हे मध्यप्रदेशातील सर्वात मोठे वस्त्रप्रावरण निर्मिती स्थान आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. या पार्कच्या निर्मिमुळे भारताच्या वस्त्रोद्योगाला नवी दिशा मिळणार असून वस्त्रप्रावरणांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. हे वस्त्रोद्यान लवकरात लवकर विकसीत केले जाणार आहे, अशी माहितीही देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच आपला वाढदिवस विविध प्रकल्यांची उद्घाटने, कल्याणकारी योजनांचा शुभारंभ आणि सामाजिक कार्यांच्या माध्यमातून साजरा केला आहे. हा त्यांचा 75 वा वाढदिवस असल्याने तो अत्यंत महत्वाचा आहे.

दहा लाख महिलांना ‘धनलाभ’

आपल्या वाढदिवसानिमित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 लाख महिलांच्या बँक खात्यांमध्ये ‘मातृवंदना’ योजनेच्या अंतर्गत निधी हस्तांतरीत करणार आहेत. तसेच ते ‘सुमन सखी चॅटबॉट’चाही शुभारंभ करतील. या चॅटबॉटचा उपयोग करुन गर्भवती महिला अपत्यांच्या स्वास्थ्याविषयीची माहिती मिळवू शकणार आहेत. तसेच ते ‘एक बगिया मां के नाम’ या योजनेच्या अंतर्गत साहाय्यता गटांच्या महिलांना रोपटी प्रदान करणार आहेत. मध्यप्रदेशात दहा सहस्रांहून अधिक महिला या योजनेच्या अंतर्गत ‘मां की बगिया’चा विकास त्यांच्या स्थानी करणार आहेत. हा एक वैशिष्ट्यापूर्ण प्रकल्प असून त्यामुळे वृक्षसंगोपन कार्याला मोठा हातभार लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त देशातील अन्य भारतीय जनता पक्ष शासितराज्यांमध्येही अनेक कार्यक्रम होणार आहेत.

Comments are closed.