लातूरमध्ये मुसळधार पाऊस, तीन जण बेपत्ता; वीज कोसळून एक महिला जखमी

लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे आणि नद्यांचे पाणी पात्राबाहेर वाहात असल्याने मोठे नुकसान झाले आहे. मागील दोन दिवसांत पाण्यात तीन जण बेपत्ता झाले आहेत. वीज पडून तीन म्हशींचा मृत्यू झाला आहे, तर एक महिला जखमी झाली आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आठ कुटुंबांना स्थलांतरित करावे लागले आहे.
16 आणि 17 सप्टेंबर रोजी वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि भरभरुन वाहणाऱ्या नद्या यामुळे मोठं नुकसान झालं आहे. जळकोट तालुक्यात मौजे पाटोदा – माळहिप्परगा मार्गावरील नाल्यावरून जाताना ऑटो रिक्षा प्रवाहात वाहून गेली. यामध्ये चारजण बसलेले होते. ऑटो चालक वाचला होता तर विठ्ठल धोंडिबा गवळी – वय 56, यांना शोधण्यात यश आले. वैभव पुंडिलक गायकवाड वय 24, आणि संगीता मुहारी सूर्यवंशी वय 32 यांचा शोध सुरू आहे. स्थानिक पोलीस आणि महसूल यंत्रणा यांच्या सहाय्याने रात्री उशिरा नांदेड वरून पाचारण करण्यात आलेली एडीआरएफ यांचे मार्फत शोधकार्य करत आहे.
मौजे तिरुका येथील सुदर्शन केरबा घोणशेट्टी (रा. तिरुका) हे मासेमारीसाठी गेले असता तिरु नदीत वाहून गेले. रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात आला, परंतु तो निष्फळ ठरला. निलंगा तालुक्यातील मौजे हाडोळी येथील शेतकरी मेहबूब शेख यांची एक म्हैस वीज पडून मरण पावली .मौजे मुसळेवाडी येथे ज्योतीराम दत्तात्रय जाधव यांची वीज पडून 1 म्हैस मरण पावली. त्यांच्या पत्नी सोजरबाई जाधव गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारासाठी त्यांना शासकीय रुग्णालयात अंबाजोगाई येथे हलविले. औसा तालुक्यातील मौजे उंबडगा येथे सततच्या पावसामुळे पूराचे पाणी घरोघरी शिरले. एकूण 8 घरांतील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागले.
Comments are closed.