Asia Cup: अशा खेळाडूंना पाहून’, भारत-पाक सामन्यावर वसीम अकरमचं मोठं वक्तव्य, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले?

पाकिस्तानला रविवारी दुबईत झालेल्या आशिया कप 2025 स्पर्धेच्या (Asia Cup 2025) ग्रुप-ए सामन्यात भारताकडून 7 गडी राखून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. भारतीय चाहत्यांच्या बहिष्काराच्या हाकेमुळे आधीच वादग्रस्त ठरलेल्या या सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) आणि त्याच्या संघाने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवलं.

सुरुवातीला फलंदाजी करताना पाकिस्तानचा डाव 20 षटकांत 127/9 वर थांबला. यामध्ये भारतीय फिरकीपटू कुलदीप यादवने 3 गडी बाद केले. त्यानंतर भारताने केवळ 15.5 षटकांत लक्ष्य पूर्ण केलं. कर्णधार सूर्यकुमार यादव 47 धावांवर नाबाद राहिले.

पाकिस्तानचं प्रदर्शन अतिशय निराशाजनक होतं. त्यांच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांसमोर टिकता आलं नाही. फक्त साहिबजादा फरहान (44) आणि शाहीन अफ्रिदी (33) यांनी काहीसा प्रतिकार केला. बाकीचे फलंदाज 15 धावांचाही टप्पा ओलांडू शकले नाहीत.

सामन्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अकरम (Vasim Akram) यांनी सलमान अली आगा आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर टीका केली. त्यांनी सांगितलं की, पाकिस्तानचे फलंदाज कुलदीप यादवच्या गोलंदाजीपुढे नीट टिकू शकले नाहीत आणि त्याच्याविरुद्ध सतत स्वीप शॉट खेळू लागले.

सोनी स्पोर्ट्सवरील चर्चेत अकरम म्हणाले, ही फक्त गोलंदाजाला वाचण्याची गोष्ट आहे. ते त्यांना नीट वाचू शकत नाहीत. सामन्यापूर्वी मी सनी भाईंशी (सुनील गावसकर) बोलत होतो. त्यांनी सांगितलं होतं, जोपर्यंत तुम्ही गोलंदाजाच्या हातातून चेंडूला वाचू शकत नाही, तोपर्यंत अशी गोलंदाजी समजत नाही. तेच इथे झालं. कुलदीपसमोर प्रत्येक दुसऱ्या चेंडूवर स्वीप खेळणं म्हणजे तुम्ही त्याला वाचू शकत नाही, याचा पुरावा आहे.

अकरम यांनी भारतीय फिरकीपटूंसमोर हसन नवाज आणि सलमान अली आगा यांच्या अपयशाबद्दलही नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, पाकिस्तानने आपल्या डावात तब्बल 63 डॉट बॉल खेळले. म्हणजे दहा षटकांपेक्षा जास्त धावा झाल्या नाहीत. याचं श्रेय भारतीय गोलंदाजांना जातं. पण हसन नवाज, हारिस आणि आपल्या कर्णधारासारखे खेळाडू पाहून वाईट वाटतं. हे सर्व प्रतिभावान खेळाडू आहेत, पण तुम्हाला गोलंदाज निवडायला हवेत, परिस्थिती समजून घ्यायला हवी. ते सर्व 150 स्ट्राइक रेटने धावा करण्याचा प्रयत्न करत होते.

भारताकडून सूर्यकुमारशिवाय अभिषेक शर्मा (13 चेंडूत 31 धावा) आणि तिलक वर्मा (31 धावा) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिलं.

Comments are closed.