सहनशिलतेचा अंत पाहू नका! प्रभादेवीचा पादचारी पूल नवरात्रीपूर्वी सुरू करा, शिवसेनेचा रेल्वेच्या अधिकाऱ्यांना इशारा

एलफिन्स्टन पूल तोडल्यानंतर प्रभादेवी, परळ परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत आणि स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी बुधवारी प्रभादेवी स्थानकातील पादचारी पुलाची पाहणी केली. नागरिकांना पूर्व-पश्चिम जाण्यासाठी प्रभादेवीचा पादचारी पूल नवरात्रीपूर्वी सुरू करा, नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका, असा इशारा त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिला.
लोकप्रतिनिधींच्या पाहणी दौऱ्यावेळी पश्चिम आणि मध्य रेल्वेसह एमएमआरडीए आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. एलफिन्स्टन पूल बंद केल्याने आता नागरिकांना पूर्व किंवा पश्चिम जायचे असेल तर लोअर परळ किंवा दादरवरून जावे लागत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी प्रभादेवी स्थानकातील पादचारी पूल तातडीने पूर्ण होणे गरजेचे होते, असे अरविंद सावंत यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. त्यावर मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अपूर्णावस्थेतील पुलाचे काम 22 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून देऊ, असे आश्वासन दिले. यावेळी पुलाची उंची पाहून तेथे एस्कलेटर्स लवकरात लवकर सुरू करण्याच्या मागणीला पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी शिवसेनेचे अरुण तोरस्कर, शाखाप्रमुख विजय भणगे, किसान पेवेकर, शैलेश पाटील, अशोक पालवणकर, उल्हास बिले, महिला आघाडीच्या शैलजा पवार, कामिनी सावंत आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
तिकीट विक्रीसाठी व्यवस्था करणार
प्रवाशांच्या सोईसाठी तिकीट विक्रीची तात्पुरती व्यवस्था करण्याचेही रेल्वे अधिकाऱ्यांनी मान्य केले. त्यासाठी महापालिका जागा उपलब्ध करून देईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी मान्य केले. या वेळी शिवडी येथील ‘एण्ड टू एण्ड’ पुलाबाबत चर्चा झाली. याबाबत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना तातडीने निर्णय घेण्याची सूचना करण्यात आली. त्या कामाचे टेंडर्स निघाले आहेत. त्याआधी तेथे वास्तव्यास असलेल्या रहिवाशांचे पुनर्वसन तातडीने करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी त्वरित कार्यवाही करावी, अशा सूचना खासदार सावंत आणि आमदार चौधरी यांनी केल्या.
Comments are closed.