माँसाहेबांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर लाल रंग फेकला, शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट; उद्धव ठाकरे यांची संतप्त प्रतिक्रिया

छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर काही समाजकंटकांनी लाल रंग फेकल्याचे आज समोर आले. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली. ‘स्वतःच्या आई-वडिलांचे नाव सांगायला लाज वाटणाऱ्याने हे दुष्कृत्य केले असावे, असा संताप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ‘हा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न आहे काय,’ असा सवालही त्यांनी केला.

माँसाहेबांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर लाल रंग टाकण्यात आल्याचे समजताच उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कवर पोहोचले. शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हेही यावेळी सोबत होते. माँसाहेबांना अभिवादन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या घटनेवर भाष्य केले. ‘आज घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. ज्याला स्वतःच्या आई-वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते अशा एखाद्या लावारीस माणसाने हे कृत्य केले असेल किंवा बिहारमध्ये मोदींच्या आईच्या अपमानाचे निमित्त करून जसा बिहार बंदचा अयशस्वी प्रयत्न झाला. तसे काही येथे करून महाराष्ट्र पेटवण्याचा हा प्रयत्न असावा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘पोलीस सध्या तपास करत आहेत. लोकांनी शांतता राखावी, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

मोठय़ा संख्येने शिवसैनिक शिवाजी पार्क येथे जमले होते. शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप होता. शिवसैनिकांनी पुतळ्याची व चौथऱ्याची स्कच्छता करून माँसाहेबांना अभिवादन केले. दादर भागात तणावाची स्थिती होती. शिवाजी पार्क परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आरोपीला तत्काळ अटक करून कारवाई करा, अशी शिवसैनिकांची भावना होती. स्थानिक आमदार महेश सावंत, शाखाप्रमुख अजित कदम हे घटनास्थळी पोहचले. त्यानंतर शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, शिवसेना नेते विनायक राऊत, उपनेते अरुण दुधकडकर, संजय सावंत, किशोरी पेडणेकर, आमदार अजय चौधरी, मनसे नेते बाळा नांदगावकर, विभागप्रमुख संतोष शिंदे हे शिवतीर्थ येथे दाखल झाले. दरम्यान, या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटले. नाशिक, नागपुरात शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली.

एक अटकेत, तपास सुरू

याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर उपायुक्त महेंद्र पंडीत व एसीपी प्रविण तेजाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला होता. रात्री उशिरा याप्रकरणी उपेंद्र पावसकर याला अटक करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

आरोपीला कठोर शिक्षण व्हावी सुप्रिया सुळे

‘ही घटना अतिशय संतापजनक असून आम्ही याचा निषेध करतो. मीनाताईंचा हा अवमान आम्हा सर्वांसाठी अतिशय क्लेशदायक आहे. सरकारने सखोल चौकशी करून हे घृणास्पद काम करणाऱ्या व्यक्तीला पकडावे. त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी,’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

योग्य ती कारवाई होईल फडणवीस

‘ही घटना अत्यंत निषेधार्ह आहे. जे कोणी हे कृत्य केले असेल त्याला पोलीस शोधून काढतील व त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या घटनेला राजकीय रंग दिला जाऊ नये, असेही ते म्हणाले.

नियम ठाकरे यांनीही केली पाहणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे जाऊन माँसाहेबांच्या पुतळ्याची पाहणी केली व घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती घेतली. त्यांनी यावेळी पोलीस अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. शिवाजी पार्क परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासा आणि 24 तासांत आरोपीचा शोध घ्या, असे त्यांनी पोलिसांना सांगितले.

Comments are closed.