ऑस्ट्रेलिया ‘अ’ चा 532 धावांचा डोंगर, कॉन्स्टसपाठोपाठ फिलिप्सचेही शतक

सॅम कॉन्स्टसपाठोपाठ जोश फिलिप्सनेही झंझावाती शतक ठोकत ऑस्ट्रेलिया ‘अ’ 6 बाद 532 असा धावांचा डोंगर रचून दिला आणि डाव घोषित केला. हिंदुस्थान ‘अ’ संघानेही चोख प्रत्युत्तर देत दिवसअखेर 1 बाद 116 अशी मजल मारली. दुसर्या दिवसाचा खेळ पावसामुळे लवकर थांबवण्यात आला, तेव्हा नारायण जगदीशन 50 तर साई सुदर्शन 22 धावांवर खेळत होता.
ऑस्ट्रेलिया ‘अ’ने हिंदुस्थान ‘अ’ विरुद्धच्या पहिल्या चारदिवसीय सामन्यात दुसऱ्या दिवशीही आपले वर्चस्व कायम ठेवले. पहिल्या दिवशी सॅम कॉन्स्टसच्या शतकी खेळीचा दणका पाहायला मिळाला होता तर दुसऱ्या दिवशी जोश फिलिप्सने फटकेबाजी केली. त्याने 77 चेंडूंत आपले झंझावाती शतक साकारले आणि त्यानंतरही फटकेबाजी कायम ठेवत 87 चेंडूंत 18 चौकार आणि 4 षटकारांची आतषबाजी करत त्याने नाबाद 123 धावा काया. त्याच्या खेळीत 96 धावा फक्त चौकार-षटकारांच्याच होत्या.
ऑस्ट्रेलियाची धडाकेबाज सुरुवात
दुसऱ्या दिवशी 5 बाद 337 धावांवरून पुखेळ सुरू केल्यानंतर काल 3 धावांवर खेळत असलेला फिलिप्स हिंदुस्थानी गोलंदाजीवर तुटून पडला. त्याला 26 धावांवर मिळालेले जीवदान हिंदुस्थानला खूपच महागात पडले. जगराजनने खलील अहमदच्या चेंडूवर झेल सोडला. त्याने 55 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. स्कॉटसोबत 81 धावांची भागीदारी करताना दोघांनी आक्रमक खेळ केला. गुरनूर बरारने स्कॉटला 81 धावांवर टिपले. त्यानंतर फिलिप्सने झेव्हियर बार्टलेटसोबत फक्त 62 चेंडूंत नाबाद 118 धावांची भागीदारी केली. त्यात बार्टलेटने 24 चेंडूत 39 धावा केल्या. या भागीच्या आतषबाजीमुळे ऑस्ट्रेलियाने पाचशेचा टप्पा गाठला आणि मग आपला डावही घोषित केला. ऑस्ट्रेलिया ‘अ’ने 5.42 धावांच्या सरासरीने 532 धावांचा पाऊस पाडला. आज त्यांनी 25 षटकांत 195 धावा चोपून काया.
हिंदुस्थान ‘अ’नेही चोख प्रत्युत्तर देत 88 धावांची सलामी दिली.
स्कॉटने अभिमन्यू ईश्वरनला 44 धावांवर त्रिफळाचीत केले. मग नारायण जगदीशन आणि साई सुदर्शनने उर्वरित खेळ खेळला. दोघेही खेळपट्टीवर पाय रोवून खेळत असताना पावसाने उर्वरित खेळावर पाणी फेरले आणि दिवसाच्या 55 षटकांनंतर सामना थांबवावा लागला. आज 25 षटके ऑस्ट्रेलिया तर 30 षटके हिंदुस्थानी संघाने फलंदाजी केली.
Comments are closed.