पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही खेळाडूंकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

विश्वनाथन आनंद, गौतम गंभीर यांचा समावेश

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त भारताच्या विविध सुप्रसिद्ध आजी-माजी क्रीडापटूंनी त्यांना शुभेच्छा संदेश पाठविला आहे. माजी क्रीकेटपटू गौतम गंभीर, बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद, नेमबाज मनू भाकर आदींचा या खेळाडूंमध्ये समावेश आहे. ग्रँडमास्टर प्रज्ञानंदनेही शुभेच्छा दिल्या आहेत. पाच वेळा विश्वविजेता राहिलेला बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीची एक हृद्य आठवणही प्रसारित केली आहे.

‘मी जेव्हा माझ्या बुद्धिबळविषयक भूतकाळाकडे दृष्टीक्षेप करतो, तेव्हा माझ्या मनात अनेक आठवणी दाटून येतात. त्या केवळ माझ्या खेळासंबंधीच्या नसतात. तर जीवनासंबंधीच्याही असतात. गुजरातसंबंधीची एक आठवण अशीच स्वारस्यपूर्ण आहे. अनेक वर्षांपूर्वी मी जेव्हा राष्ट्रीय विजेतेपदाच्या स्पर्धेत अहमदाबाद येथे खेळत होतो, तेव्हा मी गुजराती थाळीचा भोक्ता झालो होतो. तसा संदेशही मी प्रसारित केला होता. माझ्यासाठी हा एक छोटा प्रसंग होता. तथापि, अनेक वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेते झाल्यानंतर त्यांनीही माझ्या गुजराती थाळीच्या प्रेमाची आठवण ठेवली होती, इतकेच नव्हे, तर त्यांनी यासंबंधी आनंदही व्यक्त केला होता, याचे मला आजही अतिशय आश्चर्य आणि कौतुकही वाटते.’ अशा शब्दांमध्ये विश्वनाथन आनंद याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्यासह भोजन

विश्वनाथन आनंद याने पुढे असेही स्पष्ट केले आहे, की त्याने एकदा सहजगत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधताना त्याच्या गुजराती भोजनाच्या प्रेमाचा उल्लेख केला होता. त्यावेळी त्यांनी एक स्मितहास्य केले. नंतर त्वरित त्यांनी विश्वनाथन आनंद यांना जागेवरुन उठविले आणि त्यांना अहमदाबाद येथील अतिथीगृहात नेले आणि आग्रहाने गुजराती भोजन दिले. कोणतीही औपचारिकता न बाळगता किंवा शिष्टाचारांचा बागुलबुवा न दाखवता त्यांनी माझ्यासह गुजराती भोजनाचा आनंद त्या प्रसंगी घेतला. हा माझ्यासाठी आनंदाचा धक्का होता, असेही आनंद याने त्याच्या संदेशात स्पष्ट केले आहे.

शिस्त आणि भावना यांचा संगम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीत शिस्त आणि भावना यांचा सुरेख संगम आढळतो. कोणत्याही स्थितीत ते त्यांचा तोल ढळू देत नाहीत. मी यासाठी त्यांना आदर्श मानतो. ते सक्षम, शिस्तबद्ध आणि अतिशय व्यावसायिक वृत्तीचे आहेत. सतत कामात असूनही ते सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असतात. त्यांची विनोदबुद्धी कौतुकास्पद आहे. त्यामुळे ते सहजगत्या लोकांमध्ये मिसळतात आणि वातावरण हलकेफुलके करतात, अशीही प्रशंसा विश्वनाथन आनंद याने केली आहे.

क्रीडा क्षेत्रात क्रांती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रे त्यांच्या हाती आल्यानंतर देशाच्या क्रीडा क्षेत्रात क्रांती केली आहे. क्रीडा क्षेत्रात त्यांनी विविध योजना आणून आपल्या कल्पकतेचे दर्शन घडविले आहे. बुद्धीबळ ऑलिंपियाडला त्याची स्वत:ची ‘टॉर्च रिले’ असावी, ही कल्पना त्यांनीच सुचविलेलाr आहे. त्यांच्या या सूचनेमुळेच प्रथम बुद्धीबळ ऑलिंपियाडमध्ये मशाल मिरविण्याचा कार्यक्रम साजरा झाला. आज ही प्रथा या स्पर्धेच्या अभिमानास्पद परंपरेचा एक भाग झाली आहे. हे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे, अशी भलावण विश्वनाथन आनंद याने केली आहे. साऱ्या जगाने आज ही प्रथा स्वीकारली आहे, हा उल्लेख त्याने आवर्जून केला आहे.

प्रज्ञानंदकडूनही प्रशंसा

तरुण बुद्धीबळ महानायक आर. प्रज्ञानंद यानेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंबंधीचा त्याचा अनुभव कथन केला आहे. ‘माझी त्यांच्याशी दोनदा भेट झाली. मी जणू माझ्या अगदी परिचयाच्या व्यक्तीशीच बोलत आहे, अशी माझी भावना झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते नावासकट लक्षात ठेवतात, हे त्यांचे वैशिष्ट्या अद्भूत आहे. ते त्यांच्या परिचयात असलेल्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाशी उत्कट संबंध ठेवू शकतात, हे त्यांचे वेशिष्ट्या अद्भूत आहे, असे त्याने संदेशात स्पष्ट केले. पुढची अनेक वर्षे ते कार्यरत राहतील, अशा शब्दांमध्ये त्याने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दिले मोलाचे प्रोत्साहन

ऑलिंपिक पिस्तुल स्पर्धा विजेती मनू भाकर हिनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंबंधी प्रशंसोद्गार काढले आहेत. 2018 मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी मी जेव्हा ऑलिंपिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते. त्यावेळी त्यांनी मला मोलाचे प्रोत्साहन दिले. त्यांनी माझी त्यावेळी केलेली प्रशंसा आजही माझ्या लक्षात आहे. त्यानंतर अनेकदा आमच्या आणि त्यांच्या भेटीचे प्रसंग आले. प्रत्येक वेळी त्यांनी आम्हाला सकारात्मक भावनेचेच दर्शन घडविले आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेच्या वेळीही आमचा अनुभव असाच आहे, अशी प्रशंसा मनू भाकर हिने तिच्या संदेशात केली आहे.

 

Comments are closed.