न्यू इंडिया … अण्वस्त्रांना घाबरत नाही

अमृतमहोत्सवी वाढदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मध्यप्रदेशातून गर्जना, देशभरात वाढदिवस साजरा

► वृत्तसंस्था / धार (मध्यप्रदेश)

‘नवा भारत शत्रूच्या अण्वस्त्रांच्या धमकीला मुळीच भीक न घालणारा सामर्थ्यवान देश आहे. आमच्या पराक्रमी सेनादलांनी पाकिस्तानला डोळ्याची पापणी लवते न लवते, इतक्या कमी वेळेत गुडघ्यावर आणले आहे. पाकिस्तानची दहशतवादी यंत्रणा त्यांनी उद्ध्वस्त केली असून, दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या देशाला चांगलाच धडा शिकविला आहे,’ असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिनी मध्यप्रदेशातील धार येथून केला आहे. त्यांनी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी या राज्याची निवड केली असून या दिनानिमित्त अनेक विकास प्रकल्पांची उद्घाटने केली. त्यांचा 75 वा वाढदिवस बुधवारी देशभरात साजरा करण्यात आला. भारतीय जनता पक्षाने देशभरात बुधवारपासून ‘सेवा पंधरवडा’ हाती घेतला असून त्याच्या अंतर्गत अनेक सेवाभावी कार्यांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. देशासह साऱ्या जगातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अभिनंदनाचा आणि अभिष्टचिंतनांचा वर्षाव होत आहे.

धार येथील त्यांच्या सभेला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. टाळ्या आणि घोषणांच्या गजरात लोकांनी त्यांच्या वाक्यांना उत्कट प्रतिसाद दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानातील इस्लामी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदकडून नुकत्याच दिल्या गेलेल्या कबुलीचा उल्लेख केला. भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हाती घेतलेल्या ‘सिंदूर’ अभियानात या संघटनेचा म्होरक्या अझर मसूद याच्या कुटुंबातील अनेक माणसे छिन्नविछिन्न झाली, अशी कबुली या संघटनेचा हस्तक इलियास काश्मिरी याने दिली होती. भारताच्या वायुदलाने 6 आणि 7 मेच्या रात्री अचूक वायुहल्ला करून पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. बहावलपूर येथील तळात मसूद याचे कुटुंबीय होते. हा तळ नष्ट झाल्यामुळे त्याच्या कुटुंबातील 10 जण ठार झाले होते. स्वत: मसूद केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचला होता. या दहशतवादी संघटनेची यंत्रणा आणि मनोधैर्य भारताच्या या अचूक आणि विनाशकारी कार्यवाहीमुळे पूर्णत: खचले आहे.

घरात प्रविष्ट करा आणि ठार करा…

पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी रडपुंडीला येत भारताने आमची किती हानी केली, याची कबुली दिली आहे. साऱ्या जगाने हे पाहिले आहे. भारताच्या नागरिकांवर, भारताच्या अस्मितेवर आणि भारताच्या प्रतिष्ठेवर घाला घालण्याचे दु:साहस जर कोणी दाखविले, तर भारत त्याची काय अवस्था करतो, हे ‘सिंदूर’ अभियानातून पहावयास मिळाले आहे. हा नवा भारत आहे. त्याला कोणाच्याही अण्वस्त्रांच्या धमकीचे भय नाही. तो शत्रूच्या घरात घुसून त्याला लोळविणारा भारत आहे. त्याचे सामर्थ्य वादातीत आहे, अशी स्पष्टोक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन

धार येथील विराट सभेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशात अनेक विकास प्रकल्पांची उद्घाटने केली आणि शीलान्यासही केले. सामाजिक क्षेत्रापासून औद्योगिक क्षेत्रांपर्यंत अनेक क्षेत्रांमधील प्रकल्प आणि योजनांचा त्यांच्यात समावेश आहे. काही नव्या योजनांची घोषणा आणि कार्यान्वयनही त्यांच्या हस्ते केले गेले

‘मित्र पार्क’चे उद्घाटन

धार जिल्ह्यात त्यांच्या हस्ते ‘मित्र पार्क’ या वस्त्रप्रावरण निर्मिती संकुलाचा शीलान्यास करण्यात आला आहे. हे औद्योगिक उद्यान 2 हजार 150 एकर भूमीत विस्तारले जाणार असून त्यात 21 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. कमीत कमी 3 लाख रोजगार या प्रकल्पातून निर्माण होणार आहेत. हे मध्यप्रदेशातील सर्वात मोठे वस्त्रप्रावरण निर्मिती स्थान म्हणून समोर येणार आहे, अशी माहिती देण्यात आली. या पार्कच्या निर्मिमुळे भारताच्या वस्त्रोद्योगाला नवी दिशा मिळणार असून वस्त्रप्रावरणांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. हे वस्त्रोद्यान लवकरात लवकर विकसित केले जाईल, असे प्रतिपादनही मध्यप्रदेशच्या प्रशासनाने केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासनाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नेहमीच आपला वाढदिवस विविध प्रकल्पांची उद्घाटने, कल्याणकारी योजनांचा शुभारंभ आणि सामाजिक कार्यांच्या माध्यमातून साजरा केला आहे. त्यांचा हा अमृतमहोत्सवी वाढदिवस असल्याने त्याला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.

दहा लाख महिलांना ‘धनलाभ’

आपल्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 लाख महिलांच्या बँक खात्यांमध्ये ‘मातृवंदना’ योजनेच्या अंतर्गत निधी हस्तांतरित केला. तसेच त्यांनी ‘सुमन सखी चॅटबॉट’ या अभिनव योजनेचाही शुभारंभ केला. या चॅटबॉटचा उपयोग प्रामुख्याने गर्भवती महिलांना होणार आहे. तसेच ते ‘एक बगिया मां के नाम’ या योजनेच्या अंतर्गत साहाय्यता गटांच्या महिलांना रोपटी प्रदान करणार आहेत. मध्यप्रदेशात दहा सहस्रांहून अधिक महिला या योजनेच्या अंतर्गत ‘मां की बगिया’चा विकास त्यांच्या स्थानी करणार आहेत. हा वैशिष्ट्यापूर्ण प्रकल्प असून वृक्षसंगोपन कार्याला मोठा हातभार लावणारा आहे.

निरोगी महिला, मजबूत कुटुंबे…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशभरात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला असून हे अभियान 15 दिवस चालणार आहे. ते अभियान देशभरात चालविले जाणार असून त्यात देशभरातील सरकारी रुग्णलये आणि आरोग्य सेवा केंद्रांच्या माध्यमातून 1 लाख स्वास्थ्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. असंख्य सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांना या अभियानाचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

शुभेच्छा, अभिष्टचिंतनाचा वर्षाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांच्या या अमृतमहोत्सवी समारंभाच्या निमित्ताने सर्वसामान्यांसह मान्यवरांनी अभिनंदन, शुभेच्छा आणि अभिष्टचिंतनाचा वर्षाव केला. त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, भाजपचे देशस्तरीय आणि राज्यस्तरीय नेते तसेच विरोधी पक्षनेत्यांनीही त्यांना दूरध्वनीवर शुभेच्छा दिल्या. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये सत्ताधारी असणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील विविध मित्रपक्षांच्या नेत्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्कट शुभेच्छा संदेश पाठविले आहेत. विदेशातील अनेक नेत्यांनीही त्यांचे अमृतमहोत्सवी दिनानिमित्त अभिनंदन केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना दूरध्वनी करुन शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या ट्रूथ सोशल’ या माध्यमावर त्यांच्या अभिनंदनाचा संदेशही प्रसारित केला. इटलीच्या नेत्या जॉर्जिया मिलोनी यांनी त्यांच्यासमवेतचे छायाचित्र प्रसिद्ध करुन शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यांच्या कार्यालयातही असंख्य नागरिकांनी त्यांना शुभेच्छा देणारे लक्षावधी संदेश पाठविले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

राहुल गांधी यांच्याही शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिनानिमित्त काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी ‘एक्स’ या माध्यमावरून आपल्या एका ओळीच्या शुभेच्छा संदेशात ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सुखाचा जावो आणि त्यांना आयुरारोग्याचा लाभ होवो, अशी सदिच्छा व्यक्त केली. तथापि, त्यांच्या नावापुढे ‘श्री किंवा माननीय’ असा उल्लेख न केल्यामुळे अनेक ‘नेटकऱ्यां’नी गांधी यांच्यावर टीकेचा वर्षावही केला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मात्र, शुभेच्छा संदेश प्रसारित करताना, आवर्जून ‘श्री’ या आदरदर्शक शब्दाचा उपयोग केल्याचे दिसून आले. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आणि विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी शुभेच्छा संदेश प्रसारित करताना ‘माननीय’ (ऑनरेबल) या शब्दाचा उपयोग केला आहे.

देशाच्या नेतेपदी असताना ‘अमृतमहोत्सव’

देशाच्या प्रशासकीय सर्वोच्चपदी असताना ‘अमृतमहोत्सव’ साजरा करण्याची संधी प्राप्त झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे द्वितीय नेते ठरले आहेत. त्यांच्या आधी मनमोहनसिंग या पदावर असताना 2007 मध्ये त्यांचा अमृतमहोत्सव झाला होता. भारताचे प्रथम नेते जवाहरलाल नेहरु यांचा अमृतमहोत्सव मात्र, काही महिन्यांच्या अंतरात चुकला होता.

‘अमृतमहोत्सव’ उत्साहात…

अमृतमहोत्सवी वाढदिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात ‘सेवा पंधरवड्या’चा झाला शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्यप्रदेशात अनेक प्रकल्पांचा शीलान्यास

Comments are closed.