उमेदवारांचे रंगीत फोटो ईव्हीएम वर दिसतील
आयोगाची नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी : बिहार निवडणुकीपासून सुरुवात
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय निवडणूक आयोगाने ईव्हीएम मतपत्रिका अधिक वाचनीय करण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली आहे. बिहार निवडणुकीपासून ईव्हीएममध्ये प्रथमच उमेदवारांचे रंगीत फोटो दिसतील. तसेच अनुक्रमांक देखील अधिक ठळकपणे प्रदर्शित केले जातील. हा प्रयोग सर्वप्रथम बिहारमध्ये येत्या विधानसभा निवडणुकीपासून लागू केला जात असून त्यानंतर इतर राज्यांमध्ये तो लागू केला जाईल, असे निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केले.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान येत्या काही आठवड्यात होणार आहे. निवडणूक आयोगाने अद्याप तारखा जाहीर केलेल्या नसल्या तरी येत्या काही दिवसात घोषणा होऊ शकते. तथापि, मतदानाच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. निवडणूक आयोग बिहारमध्ये एक नवीन प्रयोग सुरू करत असून तिथे ईव्हीएम मतपत्रिकांमध्ये आता उमेदवारांचे रंगीत फोटो असतील. यापूर्वी, फोटो कृष्णधवल म्हणजे ब्लॅक अॅण्ड व्हाईट स्वरुपात दिसून येत होते.
निवडणूक आयोगाकडून सूचना जारी
भारतीय निवडणूक आयोगाने ईव्हीएम मतपत्रिका अधिक स्पष्ट करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केल्या आहेत. नवीन बदलानुसार, उमेदवाराचा चेहरा मतपत्रिकेच्या तीन चतुर्थांश भागावर असेल. यामुळे मतदार ओळखणे सोपे होईल. शिवाय, आता अनुक्रमांकाला अधिक महत्त्व दिले जाईल. हा उपक्रम निवडणुकांमध्ये पारदर्शकता वाढविण्यासाठी आणि मतदारांच्या सोयीसाठी डिझाइन केला आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) ईव्हीएम मतपत्रिकांची स्पष्टता आणि वाचनीयता वाढविण्यासाठी निवडणूक आचार नियम, 1961 च्या नियम 49ब अंतर्गत विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया सुलभ आणि सुधारित करण्यासाठी आणि मतदारांची सोय वाढविण्यासाठी गेल्या सहा महिन्यांत निवडणूक आयोगाने आधीच हाती घेतलेल्या 28 उपक्रमांशी हा उपक्रम सुसंगत आहे. त्यानुसार आतापासून ईव्हीएम मतपत्रिकांमध्ये उमेदवारांची रंगीत छायाचित्रे असतील. चांगल्या दृश्यमानतेसाठी उमेदवाराचा चेहरा छायाचित्राच्या तीन चतुर्थांश भागावर असेल.
उमेदवार/नोटा क्रमांक आंतरराष्ट्रीय भारतीय अंकांमध्ये छापले जातील. स्पष्टतेसाठी फॉन्ट आकार 30 असेल आणि ते ठळक अक्षरात लिहिले जातील. एकरूपता सुनिश्चित करण्यासाठी, सर्व उमेदवार/नोटा यांची नावे एकाच फॉन्ट प्रकारात आणि सहज वाचता येतील इतक्या मोठ्या फॉन्ट आकारात छापली जातील.
ईव्हीएम मतपत्रिका 70 जीएसएम कागदावर छापल्या जातील. विधानसभा निवडणुकीसाठी निर्दिष्ट आरजीबी मूल्यांसह गुलाबी कागद वापरला जाईल.
बिहारपासून सुरू होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये सुधारित ईव्हीएम मतपत्रिका वापरल्या जातील, असे निवडणूक आयोगाने नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट केले आहे.
Comments are closed.